GST भरूनही शहरात खड्डे; पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे उद्योगांवर स्थलांतरित होण्याची वेळ, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray-on-bihar-bankipur-by-election-prashant-kishor-victory-pm-modi-criticism

पुणे हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील जीवघेणे खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर आयटी अभियंत्यांपाठोपाठ स्थानिक रहिवासीही आज रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले असून त्यांनी पुण्यातील पायाभूत सुविधांच्या ढासळलेल्या स्थितीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. सामन्य नागरिकांनी टॅक्स भरूनही शहरातील रस्त्यांची ही अवस्था झालेली आहे. पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे येथील उद्योगांवर स्थलांतरित होण्याची वेळ येत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

हिंजवडीमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी काढलेल्या मोर्चातून आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज पुण्यात या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद हा अराजकीय आहे. आमच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते किंवा इतरही पक्षाचे कार्यकर्ते कोणताही राजकीय बॅनर न घेता या मोर्चात सहभागी झालेले आहेत. येथील सगळे स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा काढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता 2026 मध्ये आयटीपार्कमध्ये रस्त्यांसाठी, रस्त्यांवरील खड्ड्य़ांसाठी किंवा अस्वच्छतेसाठी, पाण्याच्या समस्येसाठी मोर्चा काढावा लागत असेल, तर हे दुर्दैवी असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. चाकणमधील भेटीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, तेथील रस्त्यांची दुरावस्था आणि कचऱ्याच्या समस्येमुळे जवळपास 20 उद्योग आणि उद्योगपती तिथून स्थलांतरित होण्यास तयार झाले आहेत. आज आपल्याला या कारणांसाठी भांडावं लागतयं हे दुर्दैव आहे. हिंजवडीतूनही असेच आयटी सेक्टर हलले, तर हजारो रोजगारांचे काय होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हिंजवडी मेट्रोचे काम अपूर्ण असताना केवळ उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने ते रखडवले जात आहे. मेट्रोच्या खालच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे. खरं तर मुद्दा हाच आहे, आपण केंद्र सरकारला टॅक्स देतो यातला किती परतावा महाराष्ट्राला येतो? जो येतो त्यातून किती रक्कम पायाभूत सुविधांसाठी वापरली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आत्तापर्यंत पाहणी केलेल्या अनेक आयटी सेक्टराला या पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळच आहे. शहरही चांगली दिसत नाहीत. सगळीकडे हीच परिस्थिती असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री या परिसरात येऊन गेले मात्र आयटी कर्मचाऱ्यांना ते भेटले देखील नाहीत. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर हे सगळे विषय एका आठवड्यात संपू शकतात. आज 2026 मध्ये जुन्या काळात जसं आपण फिता कापत फिरायचो, तसं मेट्रोसाठी फिता कापायची गरज नाही. लोकांसाठी या सेवा लवकरात लवकर सुरू करा. लोकांना किती दिवस ताटकळंत ठेवणार? नंतर तुम्हाला जे बॅनर, होर्डिंग लावून जे काही क्रेडिट घ्यायचं असेल ते घ्या. पण मेट्रो सुरू करा. मेट्रोच्या खालचे रस्ते नीट करा. चार दिवसात याच काम होऊ शकतं. नाशिकमधील रस्त्यांचे उदाहरण देताना म्हणाले की, नाशिकमधील सत्ताधारी आमदार सांगतात कलेक्टर आमचं ऐकत नाही. एकंदरीतच जर सत्तेचे हे हाल असतील तर नेमके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डीजेविरोधात पुणेकरांनी काढलेल्या मोर्चावर बोलताना ते म्हणाले की, राजकीय मंडळं, कार्यकर्तेंच्या पलिकडे पुणेकरांचा, स्थानिक जनतेचा आवज ऐकून घेणे गरजेचे आहे. याबाबत राज्य सरकारने सगळ्यांना मान्य होईल असा एक निर्णय घ्यावा. एका मतदार संघात सर्वकाही सुरू असतं तेच दुसरीकडे पोलिसांची बंदी येते. त्यामुळे एकच निर्णय घेण आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.