दिल्लीत पाच मजली रहिवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत सत्य निकेतन भागातील पाच मजली रहिवासी इमारत अचानक कोसळल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील सत्य निकेतन भागात रविवारी एक पाच मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे हॉस्टेल असल्याचे सांगण्यात येत असून, दुर्घटनेनंतर 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अडकलेल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दुपारी सुमारे 1.34 वाजता, नानकपुरा गुरुद्वाराजवळ इमारत कोसळल्याची माहिती साऊथ कॅम्पस पोलीस स्टेशनला मिळाली. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, कॅट रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफचे एक पथकही दाखल झाले असून, बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नेमकी संख्या अद्याप उपलब्ध नाही. ढिगाऱ्याखालून बाहेर काढून एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलेल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे.