
पावसाळा सुरू झाला की, निसर्गसंपन्न कोकणचे रूप अधिकच खुलून येते. हिरवाईने नटलेले डोंगर, ओसंडून वाहणारे झरे आणि पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेली धरती यामुळे कोकणच्या सौंदर्यात दरवर्षी नवी भर पडते. याच काळात संगमेश्वर तालुक्यातील कातळसडे विविध रंगांच्या रानफुलांनी बहरून गेल्याने पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी ही ठिकाणे आकर्षणाचे केंद्र बनली आहेत.
साडवली, परचुरी, माभळे, उजगाव यांसह तालुक्यातील विविध भागांमध्ये पसरलेल्या कातळसड्यांचे पावसाळ्यातील रूप पाहण्यासारखे असते. उन्हाळा आणि हिवाळ्यात रुक्ष, ओसाड भासणारे हे कातळसडे श्रावण महिन्यात मात्र विविध प्रकारच्या वनस्पती आणि रानफुलांनी सजून जातात. कातळाच्या काळसर पार्श्वभूमीवर उमललेली रंगीबेरंगी फुले निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रासारखी भासतात. या कातळसड्यांवर आढळणारी दीपकाडी, कापरी कमळ, गोरीचे फूल यांसारखी दुर्मिळ रानफुले या परिसराची जैवविविधता अधोरेखित करतात. नजर जाईल तिकडे उमललेली फुले, त्यांची आकर्षक रंगसंगती आणि त्यामधील विविध वनस्पती पाहताना पर्यटकांना निसर्गाचा अनोखा अनुभव मिळत आहे.
विशेष म्हणजे, या कातळसड्यांवरील वनस्पतींचे जीवनचक्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पावसाळ्यात अल्पकाळासाठी येथे विविध वनस्पती उगवतात, फुलतात आणि आपले बीज पुढील वर्षासाठी मातीत सोडून पुन्हा निसर्गचक्रात विलीन होतात. त्यामुळे कातळसडे हे केवळ पर्यटनस्थळ नसून जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास आहेत. श्रावण महिन्यात या फुलांचा बहर अधिक खुलत असल्याने वनस्पती अभ्यासक, छायाचित्रकार, पर्यटक आणि निसर्गप्रेमी या भागाकडे आकर्षित होत आहेत. फुलांचे निरीक्षण, छायाचित्रण तसेच कातळसड्यांवरील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण येथे भेट देत आहेत.
कातळसड्यांचे हे निसर्गवैभव जपण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला आहे. दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन, कातळसड्यांवर कचरा न टाकणे तसेच पर्यटकांनी निसर्गाला कोणतीही हानी पोहोचवू नये, याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. पावसाळ्यातील काही आठवडेच दिसणारे हे फुलांचे वैभव पाहण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कातळसडे सध्या पर्यटकांना खुणावत आहेत. कातळ, पाऊस, हिरवाई आणि रंगीबेरंगी रानफुलांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमींची पावले या भागाकडे वळू लागली आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्याच्या निसर्गपर्यटनाला चालना देण्याची मोठी संधी या कातळसड्यांमुळे निर्माण झाली आहे.




























































