
लाडक्या गणरायाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणरायाच्या मूर्तींसाठी लागणारे अलंकार, शोभेचे साहित्य, प्रसाद आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. दादर मार्पेटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. तसेच लालबाग, परळ, भुलेश्वरच्या मार्पेटसह उपनगरांमध्ये कुर्ला, घाटकोपर, बोरिवली, कांदिवली, अंधेरी परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.
मुंबईत गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत शहरात घरगुती गणपतींचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची लगबग घरोघरी पाहायला मिळत आहे. मुंबईकरांनी रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधत मार्पेट गाठले आणि बाप्पाचे विविध साहित्य खरेदी केले. बाजारात महागाई वाढली असूनही मुंबईकरांनी खरेदीमध्ये कोणतीही कसूर केली नाही. लालबाग, परळ परिसरात मंडप सजावट, शोभेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती, तर दादर पश्चिमेकडील दुकानांत पूजेच्या साहित्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. गणरायाचे आकर्षक अलंकार खरेदी करण्यास मुंबईकर पसंती देत होते. मोती, गोल्ड डायमंड अशा विविध आकर्षक डिझाईनमधील कंठी हार खरेदीसाठी भुलेश्वरच्या बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली. पश्चिम उपनगरात अंधेरीपासून बोरिवलीपर्यंत सर्वच मार्पेट गणेशभक्तांच्याच गर्दीने फुलून गेल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसले.
गर्दीवर पोलिसांचा विशेष वॉच
बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेत मुंबई पोलीस आणि पालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस चौक्या आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीचा गैरफायदा समाजकंटक घेऊ शकतात, या शक्यतेने अनुचित प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलीस अलर्ट राहिले आहेत.
- मुंबई-ठाण्यातून लाखो गणेशभक्त गौरी-गणपती सणासाठी कोकणातील गावी जातात. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये त्यांची मोठी गर्दी होती. मखर, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, कृत्रिम फुले, पूजा साहित्य आणि घरगुती सजावटीच्या विविध वस्तूंची सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.


























































