गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव! राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेरोजगारी, महागाई, परीक्षांमधील घोटाळे, आर्थिक मंदी या विषयांवरील लक्ष विचलित व्हावे यासाठी सध्या धर्माची पुंगी वाजवली जात आहे. देशात सगळीकडे धर्माची झिंग आली आहे. आता सणासुदीचे दिवस असून ऐन गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांनो… महाराष्ट्र रक्षक म्हणून तुम्ही सतर्क राहा आणि हा डाव उलथवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात केले. गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

सणासुदीला डीजे लावायचाच कशाला?

सणासुदीला डीजे आणि डॉल्बी वगैरे लावणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. कानठळय़ा बसवणारा डीजे लावायचाच कशाला? आपले सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे करावेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

जीडीपी वाढला सांगता, मग सोने का विकत घ्यायचे नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा जीडीपी 7.8 टक्क्यावर आल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात तो जेमतेम दोन टक्के आहे. जीडीपी वाढला असेल तर तुम्ही परदेशात जाऊ नका, सोने विकत घेऊ नका, असे मोदी का सांगतात, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले, आपल्या देशातील 503 परदेशी कंपन्यांनी हिंदुस्थानातील कामकाज बंद केले आहे, तर देशातील 13 हजार उद्योगपती देश सोडून बाहेर गेले आहेत.

बाबा, अस्त्रालय आणि ऑस्ट्रेलिया

संपूर्ण देशात सध्या धर्माची झिंग चढवली जात आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी टीव्हीवर प्रवचने झोडत असलेल्या एका बाबाचा उल्लेख केला. ते म्हणाले, हा बाबा राम-रावण युद्धाबाबत काहीही स्टोऱ्या झोडतो. म्हणे हे युद्ध झाल्यानंतर असंख्य अस्रे पडली होती. रामाने ही अस्त्रे कोणाच्या हातात लागता कामा नये असे सांगितले आणि हनुमानाला सर्व अस्त्र्ाs दहा हजार किलोमीटर दूर जाऊन ठेवा, असा आदेश दिला. त्याप्रमाणे हनुमानाने तेथे जाऊन अस्रे ठेवली. त्या ठिकाणाचे नाव ‘अस्त्रालय’ झाले. त्यानंतर त्याचे नामकरण ऑस्ट्रेलिया असे करण्यात आले असे टीव्हीवरचा बाबा सांगतो. आता अस्त्रालयाचे जर ऑस्ट्रेलिया झालं असेल तर हॉलंड, न्यूझीलंड आणि इंग्लंडचं काय करायचं, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले की, धर्माबद्दल अभिमान असावा, पण झिंग असू नये.

महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी काढायला लावला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या रांगेत दुसरे कुणीच बसू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावायचाच असेल तर तो दुसऱया ठिकाणी लावावा.