साखरेच्या भाववाढीवर भोजपुरी गाणे व्हायरल; ‘मोदी काका, साखर घेऊ की दारू?’ म्हणत लगावला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात साखरेच्या दरवाढीची चर्चा सुरू असतानाच, या मुद्द्यावरचे एक भोजपुरी गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘साखर 75 रुपये झाली, पौआही 75 रुपयांचा… मोदी काका, मी काय पिऊ?’अशा उपरोधिक शब्दांत भोजपुरी गाण्याच्या माध्यमातून महागाईवर भाष्य करण्यात आले आहे. सदर गाण्यामध्ये साखरेच्या किमतीची तुलना ‘पौआ’ म्हणजेच देशी दारूच्या किमतीशी करण्यात आली आहे. ‘चहा पिऊ की पौआ?’ असा सवाल करत महागाईवर सरकारला टोला लगावण्यात आला आहे. साखरेसोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचाही गाण्यात उल्लेख आहे.

हे गाणे अशोक प्रेमी यादव यांनी गायले असून, त्याचे बोल संदीप बाबू यांनी लिहिले आहेत. विशेष म्हणजे गाण्याचा व्हिडिओ कोणत्याही भव्य सेट किंवा महागड्या लोकेशनशिवाय साध्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. यादव स्टुडिओमध्ये माइक हातात घेऊन गाताना दिसतात. व्हिडिओतील काही दृश्यांसाठी एआयचाही वापर करण्यात आला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, साध्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या गाण्याला अवघ्या दहा दिवसांत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बोलीभाषेतील सहज शब्द आणि रोजच्या जीवनाशी संबंधित महागाईच्या मुद्द्यावर केलेले उपरोधिक भाष्य यामुळे गाणे सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत आहे.

भोजपुरी गाण्यांमधून चालू घडामोडी आणि सामाजिक विषयांवर भाष्य करण्याची परंपरा जुनी आहे. एखादा विषय चर्चेत आला की त्यावर लगेच गाणी तयार केली जातात. त्यामुळे एका सोशल मीडिया युझरने भोजपुरी इंडस्ट्री ‘वर्तमानपत्रांपेक्षाही वेगवान’ असल्याची मजेशीर प्रतिक्रिया दिली. सध्या ‘साखर 75 झाली…’ ही ओळ सोशल मीडिया रील्स आणि व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत असून, महागाईवर केलेल्या या भोजपुरी गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.