
कार्यकाळ संपून 3 वर्षे झाल्यानंतरही कोणताही वैधानिक आणि घटनात्मक अधिकार नसतानाही मुंबई शहर कबड्डी संघटना चालवत असलेल्या विद्यमान पदाधिकाऱयांची ‘भाईगिरी’ मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही दिसली. प्रलंबित निवडणूक, नव्या राष्ट्रीय क्रीडा कायद्यानुसार घटनादुरुस्ती तसेच कबड्डी संघ आणि संघटकांच्या असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत कोणतीही साधकबाधक चर्चा न करताच ही सभा अवघ्या तासाभरात ‘उरकण्याची’ किमया सभेचे आणि संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दाखवली.
वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे पदाधिकाऱयांनी सभासदांसमोर निर्णय जाहीर करणे आणि आपले इतिवृत्त मंजूर करण्याची सभा नव्हे. ही सभा सभासदांना पदाधिकाऱयांच्या कारभाराबाबत जाब विचारण्याचे घटनात्मक व्यासपीठ असते. मात्र या सभेत मोजक्याच सदस्यांनी आपले प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रश्नांना दाबण्याचा वारंवार प्रयत्नच केल्याचे दिसून आले. एकाही सदस्याला त्यांच्या प्रश्नाबाबत समाधानकारक उत्तर न देताच नंतर बघू, चर्चा करू, अशी उत्तरे देत थांबवण्याचा प्रकार अध्यक्षांनी केला.
कबड्डी संघटनेची 3 वर्षे निवडणूक झालेली नाही. त्यामुळे आजच्या सभेत त्याबाबत जोरदार चर्चा अपेक्षित होती. मात्र जगताप यांनी दिवंगत राष्ट्रीय कबड्डीपटू तारक राऊळ यांच्या शोकसभेला जाण्याचे कारण पुढे करत सदस्यांच्या प्रश्नांना अक्षरशः गुंडाळले. अध्यक्षांना घाई असल्यामुळे त्यांनी सभास्थानी दुसरा अध्यक्ष नेमून सभा सुरू ठेवणे गरजे होते, पण त्यांनी आपल्या प्रथेप्रमाणे सभा उरकण्यातच धन्यता मानत सर्व विषयच बाजूला ठेवले.
नुकताच राज्य कबड्डी संघटनेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवडणूक पुढील तीन महिन्यात अपेक्षित आहे. राज्याच्या निवडणुकीआधी सर्व जिह्यांची निवडणूक आणि घटनादुरुस्ती पेंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे करणे बंधनकारक आहे. याबाबत या सभेत चर्चा व्हावी, असा उपस्थित सदस्यांचा सूर होता, पण विद्यमान पदाधिकाऱयांना नव्या क्रीडा कायद्यानुसार निवडणूक लढवता येणार नसल्याचे स्पष्ट असल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या या तांत्रिक प्रक्रियेबाबत जराही रस दाखवला नसल्याचे सभेत निदर्शनास आले. तसेच घटना आणि नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱया पदाधिकाऱयांनी आपला कारभार नियमांची चौकट सांभाळून घटनेनुसार पारदर्शक होत असल्याचे ढोल बडवण्यात धन्यता मानली.


























































