
‘पॉश’ कायद्यांतर्गत तक्रार केली म्हणून ट्रेनिंग मॅनेजर पदावर असलेल्या महिलेला नोकरीवरून काढून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे.
वागळे इस्टेट येथील फर्स्ट व्रेडिट सर्व्हिसेस आयटीईएस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत माजी प्रशिक्षण व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या महिलेने कामाच्या ठिकाणी होणाऱया गैरवर्तनाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याप्रकरणी कंपनीने महिलेला कामावरून कमी केले. याविरोधात महिलेने अॅड. प्रशांत नायक यांच्या वतीने कामगार न्यायालयात अर्ज दाखल केला. सेवा समाप्तीचा आदेश रद्द करण्यात यावा तसेच कंपनीने ग्रॅच्युईटी, पगार आणि इतर भत्ते व्याजासह द्यावेत अशी मागणी अर्जाद्वारे केली असून या अर्जावर न्यायाधीश सोनाली जंगमस्वामी यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याप्रकरणी कंपनीला नोटीस बजावली असून या अर्जावर 17 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.


























































