अंधेरीत ‘स्पेशल 26’ सिनेमाचा सिक्वेल, तोतया आयकर व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा कार्यालयात छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी येथील एका व्यावसायिकाच्या कार्यालयात सहा पुरुष व तीन महिला तोतया अधिकाऱयांनी छापा टाकला. आयकर व गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत ते आत घुसले. कारवाईच्या नावाखाली सर्वांना धमकावत सर्व निघून गेले. नंतर कारवाई होऊ द्यायची नसेल तर एक कोटी दे अशी मागणी त्यांनी केली. पण वेळीच खऱया पोलिसांची एण्ट्री झाली आणि ‘स्पेशल 26’ सिनेमाप्रमाणे व्यावसायिकाला लुटायचा प्रयत्न हाणून पडला.

राजकुमार पंडासामी (49) यांच्या कार्यालयात आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचमधील शासकीय अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगत व बनावट ओळखपत्रे दाखवत नऊ जण घुसले. त्यानंतर राजपुमार तसेच त्यांच्या पत्नी व कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेऊन त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून रोखले. कार्यालयात झाडाझडती घेतल्याचे नाटक करून सर्वजण निघून गेले. त्यानंतर पुढील कारवाई होऊ द्यायची नसेल तर एक कोटी दे अशी मागणी आरोपींनी राजपुमार यांच्याकडे केली. हा बनावट प्रकार राजपुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संतोष खोपटकर (37), विनय मोरे (37), प्रेम सबनानी (50), प्रज्ञा माईन (27), रेश्मा वारंग (41) आणि सबीना शेख (48) अशा सहा भामटय़ांना पकडले. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.