जन-धन योजनेतील दर चौथे खाते निष्क्रिय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री जन-धन’ योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील दर चार जन-धन खात्यांपैकी एक खाते सध्या निष्क्रिय झाले आहे. तसेच तब्बल 5.72 कोटी खात्यांमध्ये एक रुपयाही शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार, 12 ऑगस्ट 2026 पर्यंत देशभरात एकूण 59 कोटी 3 लाख 74 हजार 907 जन-धन खाती उघडण्यात आली आहेत. या सर्व खात्यांमध्ये मिळून एकूण 3,15,179.90 कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. विशेष म्हणजे या योजनेत महिलांचा सहभाग लक्षणीय असून एकूण खात्यांपैकी 32.89 कोटी खाती महिलांची (तृतीयपंथीयांसह) आहेत, तर 26.14 कोटी खाती पुरुषांच्या नावावर आहेत. देशातील 15.36 कोटींहून अधिक खाती अकार्यक्षम झाली असून 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे.

उत्तर प्रदेश-बिहारमध्ये प्रमाण जास्त

उत्तर प्रदेशात सर्वाधिक 95.92 लाख झीरो बॅलन्स खाती असून बिहारमध्ये 62.35 लाख आणि महाराष्ट्रात 36.04 लाख खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे.