मध्य प्रदेशात विषारी दारूचे 11 बळी, शरीर निळे पडले; 35 जण रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील सागरमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.  सुमारे 35 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती अजूनही गंभीर आहे. गंभीर रुग्णांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज आणि सागर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयात आणलेल्या रुग्णांचे शरीर निळे पडले होते. त्यांना अंगदुखी जाणवत  होती.

ही घटना बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौरोजा आणि घुघरा खुर्द या गावांमध्ये केंद्रित आहे. बाधित गावांमध्ये तपासणी सुरू असून दारू प्यायलेल्यांची चाचणी केली जात आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसत आहेत त्यांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले जात आहे. हे मृत्यू मेथिल अल्कोहोलच्या सेवनामुळे झाल्याचा संशय असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिले आहेत. सहा दारूची दुकाने सील आणि नमुने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मेथिल अल्कोहोलच्या सेवनाचा प्राथमिक अंदाज

जिल्हाधिकाऱयांनी सांगितले की, आतापर्यंत करण्यात आलेल्या दोन-तीन शवविच्छेदनांमधून प्राथमिकदृष्टय़ा मेथिल अल्कोहोलचे सेवन झाल्याचे दिसून आले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून दारूचा पुरवठा केला जात होता. काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.