
धारावी परिसरात घरगुती एलपीजी सिलिंडरचा स्पह्ट होऊन आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. शीव-धारावी लिंक रोडवरील राजीव गांधी नगर, राजीव गांधी स्पोर्ट्स क्लबजवळील दोन मजली इमारतीतील घरात ही घटना घडली. आगीमध्ये दोन लहान मुलांसह चौघेजण जखमी झाले. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घरगुती सिलिंडरचा भल्यापहाटे स्पह्ट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवली आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधी आगीवर नियंत्रण मिळवले. तथापि, आगीत चार जण जखमी झाले. पोलिसांच्या वाहनातून त्यांना तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये पाच वर्षीय रोहन गुप्ता आणि चार वर्षीय रुद्र गुप्ता या दोन लहानग्यांसह पूनम जैस्वाल आणि पार्वती गांधारी यांचा समावेश आहे. पूनम जैस्वाल ही आगीमध्ये 30 टक्के भाजली. मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि बेस्टच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


























































