दिल्लीत वसतिगृह कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, 40 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले; पाच गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील सत्य निकेतन भागात खासगी विद्यार्थी वसतिगृह असलेली पाच मजली इमारत आज दुपारी कोसळली. त्यात चार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आठ विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले असून मलब्याखाली आणखी विद्यार्थी दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

‘हॉस्टेल डेज’ असे या इमारतीचे नाव असून तेथे मुलांसाठी वसतिगृह होते. सत्य निकेतन हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या जवळ असून या भागात अनेक पेइंग गेस्ट व खासगी वसतिगृहे आहेत. इमारत दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास कोसळली. नेमके किती विद्यार्थी मलब्याखाली अडकले आहेत याची माहिती मिळालेली नाही, मात्र, 30 ते 40 विद्यार्थी दबल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वसतिगृहाच्या नोंदीवरून यासंदर्भात माहिती काढण्यात येत आहेत. अग्निशमन दल व इतर बचाव पथकांकडून मलबा बाजूला काढण्यात येत आहे. आठ विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव पथकांना यश आले. पाच जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली. एका विद्यार्थ्याला रुग्णालयात मृत जाहीर केले. त्याची ओळख पटू शकलेली नाही. स्थानिक तरुण हातात हातोडा घेऊन काँक्रीटचा मलबा पह्डून तो हटविण्यासाठी मदत करत होते. इमारत कोसळल्यानंतर जवळपासच्या वाहनांवरही मलबा कोसळला.

आम्हाला वाचवा… मलब्यात दबलेल्या विद्यार्थ्यांचे मित्रांना कॉल

इमारतीच्या मलब्यात दबलेले विद्यार्थी त्यांच्य मित्रांना व नातेवाईकांना कॉल करून आम्हाला वाचवण्यासाठी आर्त हाक देत आहेत. बचाव पथकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मोहीम तीव्र केली असून श्वानपथकांचीदेखील मदत घेण्यात येत आहे.

 तळमजल्यावर खोदकाम सुरू होते

प्राप्त माहितीनुसार, इमारत 40 ते 50 वर्षे जुनी होती. गेल्या तीन दिवसांपासून तळमजल्यावर खोदकाम सुरू होते. इमारतीचा पायादेखील खचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी वसतिगृहात त्यांच्या खोल्यांमध्येच झोपलेले होते. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहातच होते.