
दोन सेट जिंकले, तिसऱया सेटमध्येही सुरुवातीला आघाडी… सामना जवळपास खिशात आला असतानाच टेलर फ्रिट्झच्या हातातून विजय निसटला. अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुंडोलोने दोन सेट पिछाडीवरून झंझावाती पुनरागमन करत अमेरिकेच्या नवव्या मानांकित फ्रिट्झचा 3-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला आणि अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. निर्णायक सेटमध्ये फ्रिट्झकडे सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तीन ब्रेक पॉइंटची संधी होती; सेरुंडोलोने ती परतवून लावत सामना हिसकावून घेतला.
फ्रिट्झच्या पराभवामुळे अमेरिकेच्या घरच्या मैदानावरील आशांनाही मोठा धक्का बसला. याच दिवशी पाचव्या मानांकित फ्लाव्हिओ कोबोलीला बेल्जियमच्या अलेक्झांडर ब्लॉक्शने चार सेटमध्ये हरवत मोठा उलटफेर केला. ब्लॉक्श प्रथमच ग्रॅण्डस्लॅमच्या चौथ्या फेरीत पोहोचला आहे.
महिलांच्या गटातही धक्कादायक निकालांची मालिका पाहायला मिळाली. 22 व्या मानांकित मॅडिसन कीजला झेंग किनवेनने 1-6, 7-6, 7-5 असे हरवले. तिसऱया सेटमध्ये झेंग 0-5 अशी पिछाडीवर असतानाही तिने सामना फिरवला आणि मॅच पॉइंट वाचवत सनसनाटी विजय मिळवला.
दुसरीकडे कोको गॉफने क्रिस्तिना बुचाचा 6-3, 6-4 असा, तर इगा स्वियाटेकने मेरी बौझकोव्हाचा 7-6, 7-6 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. मिर्रा आंद्रीव्हानेही आगेकूच केली. नाओमी ओसाकाने एलिस मर्टेन्सला 6-3, 3-6, 7-5 असे हरवत पुढची फेरी गाठली. त्यामुळे पुरुषांच्या गटात फ्रिट्झ-कोबोलीसारखे दिग्गज गारद होत असताना महिला गटातही झेंगच्या पुनरागमनाने स्पर्धेची रंगत कमालीची वाढली आहे.
























































