
नरीमन पॉइंट आणि विशाल अरबी समुद्रकिनाऱ्यावरील ऐतिहासिक एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने ताब्यात घेतल्यानंतर या इमारतीवर एअर इंडियाचा सेंटॉर हा महाकाय लोगोही आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या लोगोच्या जागी २४ व्या मजल्यावर आता महाराष्ट्र शासनाचा नवीन लोगो झळकणार आहे. नवा लोगो तयार करण्याची जबाबदारी जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर सोपवण्यात आली आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टने आतापर्यंत नव्या लोगोची पंधरा डिझाईन्स तयार केली आहे. त्यावर अजूनही काम सुरू आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या लोगोवर शिक्कामोर्तब करतील.
राज्य सरकारने सुमारे १ हजार ६०१ कोटी रुपये खर्च करून एअर इंडियाची इमारत ताब्यात घेतली आहे. ही इमारत ताब्यात आल्यावर इमारतीच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासनाचा लागला, पण २३ मजल्यांच्या या इमारतीच्या गच्चीवर एअर इंडियाचा लोगो कायम होता. हा लोगोही आता काढण्यात आला. असून एअर इंडियाची आता ओळख खऱ्या अर्थाने पुसली गेली आहे.
महाकाय लोगो
या इमारतीच्या गच्चीवर सेंटॉर हा एअर इंडियाचा ३८ फूट बाय २४ फुटांचा महाकाय लोगो होता. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत कुशलतेने हा लोगो खाली उतरवला आहे. हा लोगो खाली उतरवण्याचे मोठे आव्हान होते. कारण अरबी समुद्राकडून तुफान वेगाने येणारे वारे आणि पाऊस अशी दुहेरी कसरत होती. पण या लोगोचे चाळीस तुकडे करण्यात आले. हा लोगो काढण्यासाठी तब्बल दहा दिवस लागले.
एअर इंडियाच्या या इमारतीच्या गच्चीवर आता राज्य सरकारचा नवा लोगो लागणार आहे. नव्या लोगोची किमान १५ डिझाईन्स जे. जे. स्कूल ऑफ आर्टने तयार केली असून अजूनही काही डिझाईन्स तयार करण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या डिझाईन्सची छाननी करतील आणि अंतिम डिझाईनची निश्चिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर होईल.


























































