Share Market Update – शेअर बाजारात रेड अलर्ट! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स-निफ्टी कोसळला, IT शेअर्समध्ये मोठी पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने घसरणीसह सुरुवात केली.

सकाळी दहाच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल 345 पॉइंट अर्थात 0.45 टक्क्यांच्या घसरणीसह 76,169.56 वर पोहोचला, तर दुसरीकडे निफ्टीतही 107 पॉइंटची घसरण झाली आणि तो 0.45 टक्क्यांच्या घसरणीसह 23,790.55 वर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आयटी शेअरमध्ये मोठी पडझड झाल्याचे दिसून आले.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याज दर वाढवण्याची शक्यता बळकट झाल्याने शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला असून इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठा फटका बसला आहे. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास निफ्टी आयटी निर्देशांक 1.27 टक्के घसरून 30,306.15 वर आला. यामुळे आयटी क्षेत्रात गुंतवणूक केलेल्यांना मोठा फटका बसला.

आयसी सेक्टर्समधील प्रमुख शेअर्समध्ये झालेली घसरण

  • इन्फोसिस 2.2 टक्के
  • टेक महिंद्रा – 1.57 टक्के
  • एचसीएल टेक – 1.37 टक्के
  • विप्रो – 1.7 टक्के
  • टीसीएस – 0.83

मिडकॅप आयटी कंपन्या असलेल्या एमफॅसिस (1.87 टक्के), पर्सिस्टंट सिस्टीम्स (1.56 टक्के) आणि एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (1.4 टक्के) यामध्येही मोठी घसरण झाली.

दरम्यान, अमेरिकेत शुक्रवारी जाहीर झालेल्या मजबूत नोकरीच्या आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या बैठकीत व्याजदर वाढवेल अशी शक्यता वाढली आहे. अमेरिकेत जास्त व्याजदर राहिल्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांचे व्हॅल्युएशन कमी होते. हिंदुस्थानी आयटी कंपन्यांचा मुख्य व्यवसाय अमेरिकेवर अवलंबून असल्याने तिथे व्याजदर वाढल्यास अमेरिकन ग्राहक त्यांच्या तंत्रज्ञानावरील अनावश्यक खर्चात कपात करतात, ज्याचा थेट फटका हिंदुस्थानी कंपन्यांच्या कमाईला बसतो.