
सेंच्युरी मिलची जमीन व्यावसायिक विकासासाठी वापरणार असल्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात गिरणी कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली आहे. ‘गिरणी कामगार एकजूट’च्या वतीने मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत वरळी येथील पांडुरंग बुधकर मार्गावरील सेंच्युरी मिल गेटसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनांनी जाहीर केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सेंच्युरी मिल परिसरातील संबंधित जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे. मात्र, या जमिनीचा उपयोग गिरणी कामगारांच्या घरांसाठी न करता, खासगी विकासकाच्या माध्यमातून दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने व्यावसायिक विकास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला गिरणी कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. जमिनीचा उपयोग जर गिरणी कामगारांसाठी होणार नसेल तर गिरणी कामगारांचा विचार सरकार कधी करणार, असा सवाल उपस्थित करत संबंधित मिलची जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी द्यावी आणि त्यांचे पुनर्वसन मुंबईतच करावे अशी ठाम मागणी संघटनांनी केली आहे.
हजारो कामगार घराच्या प्रतीक्षेत
मुंबईच्या औद्योगिक विकासात गिरणी कामगारांचे योगदान मोठे राहिले आहे. मात्र, आजही हजारो गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. या कामगारांच्या हक्कासाठी विविध संघटना एकत्रित रस्त्यावर उतरणार आहेत. कॉ. विजय पुलकर्णी, कल्पेश नाडकर्णी, हेमंत गोसावी, रमाकांत बने, अॅड. पवन मोरे, अॅड. अरुण निंबाळकर आणि हरिनाथ तिवारी हे या निदर्शनांचे नेतृत्व करणार आहेत.
























































