
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दैनंदिन एक्प्रेस गाडी सुरू होत असतानाच कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनची मागणी नव्याने उचलून धरली आहे. नवीन गाडी दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा पर्याय ठरू शकत नाही, अशी ठाम भूमिका मांडत प्रवासी संघटनांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी रेल्वे प्रशासन पातळीवर लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कोविड काळात 2021 मध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली. नंतर ही गाडी सुरू करण्यास रेल्वेकडून टाळाटाळ केली जात आहे. कित्येक वर्षे प्रवासी सेवेत धावलेली ही पॅसेंजर ट्रेन रत्नागिरी व रायगड जिह्यातील ग्रामीण प्रवाशांसाठी महत्त्वाची दैनंदिन सेवा होती. या गाडीसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी केला.




























































