माँसाहेबांच्या आठवणीने रमाधाम गहिवरले, स्मृतिदिनानिमित्त गुंजले भजन-कीर्तनाचे सूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणीने आज ‘रमाधाम’ गहिवरून गेले. निमित्त होते त्यांच्या स्मृतिदिनाचे. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे सूर रमाधाममध्ये गुंजले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तसेच माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून रमाधाम वृद्धाश्रम साकारला आहे. मनमोहक हिरवाई, निसर्गरम्य वातावरण तसेच आजी-आजोबांची मोठय़ा ममतेने करण्यात येत असलेली सेवा यामुळे ही वास्तू पवित्र झाली आहे. माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. खोपोली येथील मुक्ताई महिला भजनी मंडळाने अभंग व भक्तिगीते सादर केली.

याप्रसंगी शशिकांत डोंगरे, हेमंत काने, विलास चाळके, सुलक्षणा दाभाडे, समृद्धी म्हामुणकर, शशिकला पवार, सुखदा बने, शोभा सावंत, संदीप चव्हाण, संगीता गुरव, महेश नायकवडे, प्राची तावडे, शोभा भोसले, उषा जाधव आदींनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केले.

चंदूमामा वैद्य यांनी आजीआजोबांची केली विचारपूस

रमाधाम वृद्धाश्रमचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी व्हिडीओ संभाषणाद्वारे रमाधाममधील आजी-आजोबांशी संपर्क साधून त्यांची मोठय़ा आस्थेने विचारपूस केली. तसेच माँसाहेबांच्या स्मृतीला उजाळा देत अभिवादन केले. यावेळी रमाधाम वृद्धाश्रमातील वातावरण भावुक झाले होते. रमाधाम म्हणजे तुमचे दुसरे घर असून तुम्ही कसलीही चिंता करू नका, असे चंदूमामा वैद्य यांनी यावेळी सांगितले.