सहा वर्षांच्या चिमुकल्याने जिंकली मने, नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिगी बँकेतील पैसे केले दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळ-तिबेट सीमेवर 26 ऑगस्टला महाकाय हिमकडे कोसळून आलेल्या महापुराने नेपाळमध्ये अक्षरशः तांडव घातले. दीड हजारांपेक्षा जास्त लोकांचा या महापुराने बळी घेतला. अजूनही साडेचार हजार लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. या भीषण पुरामुळे झालेल्या मालमत्ता आणि जीवितहानीच्या फोटो आणि व्हिडीओंनी सर्वांचेच मन हेलावले. या संकटाच्या काळात उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने दाखवलेल्या संवेदनशीलतेने सर्वांचीच मने जिंकली आहेत. अल्फाज शेख असे त्या मुलाचे नाव असून  या लहानग्याने पिगी बँकमधील सगळी सेव्हिंग नेपाळ पूरग्रस्तांना देऊ केली आहे. त्याच्या या छोट्याशा कृतीने माणूसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

कुशीनगर जिल्ह्यातील पडरौना तहसील क्षेत्रातील बेटिया गावचा रहिवासी असलेला अल्फाज, दूरदर्शन आणि सोशल मीडियावर नेपाळमधील पुराचे भयानक दृश्य पाहून अत्यंत भावूक झाला होता. पुरामुळे बेघर झालेल्या आणि अडचणीत सापडलेल्या लोकांचे दुःखाचे फोटो पाहून त्याने स्वतः साठवलेले पैसे त्यांना देण्याचा त्यांचा निश्चय केला. 3 सप्टेंबर रोजी अल्फाज आपल्या कुटुंबीयांसह कुशीनगरचे जिल्हाधिकारी महेंद्र सिंह तवर यांच्या कार्यालयात पोहोचला. त्याच्या हातात वर्षभराच्या बचतीने भरलेली पिगी बँक होती. त्याने ही पिगी बँक थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द करत, त्यातील सर्व रक्कम मदत निधीत जमा करून नेपाळमधील पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. ज्या वयात मुले खेळणी किंवा स्वतःच्या लहान-सहान गरजांसाठी पैसे साठवतात, त्या वयात अल्फाजने आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या अनोळखी लोकांसाठी दाखवलेली ही आपुलकी पाहून तेथे उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी भारावले.

जिल्हाधिकारी महेंद्र सिंह तवर यांनी या चिमुकल्याच्या या मदतीची माहिती आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर देखील शेअर केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मते, अल्फाजची ही इच्छा आणि भावना लक्षात घेऊन त्याचे हे पैसे योग्य मार्गाने नेपाळपर्यंत कसे पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मदतीचे मूल्य हे त्यात असलेल्या पैशांपेक्षा त्यामागच्या भावनेवरून ठरते, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अल्फाजचे आजोबा कासलीम अली यांनी सांगितले की, नेपाळमधील पुराच्या बातम्या आणि फोटो पाहून अल्फाज खूप अस्वस्थ झाला होता. त्याने स्वतःहून गुल्लकमधील जवळपास 20 हजार रुपयांची बचत पूरग्रस्तांना देण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यानंतर आम्ही त्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. अल्फाजचे वडील रियाधमध्ये नोकरी करतात आणि तो चार भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आहे.