एअर इंडिया एक्सप्रेसचे इंजिन हवेतच बंद; अबू धाबीला जाणारे विमान कोचीला परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग 737 विमानाला तांत्रिक बिघाडामुळे कोचीला परतावे लागले. अबूधाबीला जाणारे हे विमान 36 हजार फूट उंचीवर असताना, विमानाच्या एका इंजिनमधील तेलाची पातळी झपाट्याने कमी झाली. पायलटच्या लक्षात येताच क्रूने खबरदारीचा उपाय म्हणून इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX 415 या विमानामध्ये ही घटना घडली. या विमानाने कोचीहून उड्डाण घेतल्यानंतर सुमारे 50 मिनिटांनी इंजिन क्रमांक 1 मधील तेलाची पातळी कमी होत असल्याचे निदर्शनास आले. पायलटने परिस्थिती लक्षात घेत, विमान पुन्हा कोचीला नेण्याचा निर्णय घेतला. तेलाचा दाब धोकादायक पातळीपर्यंत घसरल्याने संबंधित इंजिन बंद करण्यात आले. एक इंजिन बंद असतानाही विमान सुरक्षितपणे उड्डाण सुरू ठेवू शकत होते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमान अबू धाबीऐवजी कोचीला परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

विमान कोची विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली असली, तरी विमान सुरक्षितपणे परतल्याने मोठा धोका टळला. घटनेनंतर विमानाच्या तांत्रिक बिघाडाची तपासणी करण्यात येत आहे.