
हिंदुत्व ही संकल्पना अत्यंत स्पष्ट असून, व्यक्तीची कर्मभूमी जिथे असते, तिथेच त्याची निष्ठा असायला हवी. त्यामुळे ब्रिटिश हिंदूंची खरी निष्ठा ही ब्रिटनशीच असायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. लंडनमध्ये आयोजित सेलिब्रेशन ऑफ वननेस या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
जन्मभूमी आणि कर्मभूमी यातील निष्ठेच्या संघर्षाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले, ब्रिटिश हिंदू जर खरोखर काया-वाचा-मनाने सच्चे हिंदू असतील, तर ब्रिटन आणि हिंदुस्थानच्या हितांमध्ये कधीही संघर्ष निर्माण होणार नाही. जर असा प्रसंग आलाच, तर ब्रिटिश हिंदूंनी ब्रिटनच्याच पाठीशी उभे राहणे स्वाभाविक आहे.
एखादा अपवाद वगळता, हिंदुत्वाची यावर स्पष्ट भूमिका आहे. तुमची कर्मभूमी हीच तुमच्या निष्ठेचे स्थान आहे. जन्मभूमीकडून मिळालेल्या मूल्यांचा उपयोग कर्मभूमीची सेवा करताना होतो. त्यामुळे हिंदुत्व कधीही स्वतःच्या कर्मभूमीशी विश्वासघात करायला शिकवत नाही, असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
STORY | Loyalty of British Hindus lies with ‘karma bhoomi’ UK: RSS chief Bhagwat
Hindutva is clear that your ‘karma bhoomi’ is where your loyalties lie and for British Hindus that is the UK, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat said on Sunday.
READ:… pic.twitter.com/02QtxFM3U6
— Press Trust of India (@PTI_News) September 6, 2026
विविधतेत एकता हेच हिंदुत्व!
हिंदू हा शब्द कोणत्याही एका धार्मिक पद्धतीवरून किंवा जीवनशैलीवरून समजून घेता येणार नाही. हिंदू हा एक स्वभाव आहे. विविधता ही नैसर्गिक असल्याने प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकतो. जगातील सर्व नद्या शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे मानवी मार्ग वेगवेगळे असू शकतात. एकतेसाठी सर्वांना एकसारखे करण्याची गरज नाही. विविधतेतच एकता दडलेली आहे, असेही भागवत यावेळी म्हणाले.
























































