
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेला विद्यानंद बापट या तरुणाने जोरदार विरोध केला. माध्यमांशी बोलताना बापट यांच्यावर एकाने हल्लाही केला. पुण्यात रविवारी डीजेविरोधात मोर्चा निघाला पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी बापट यांना मोर्चात जाण्यास मज्जाव केला. हा मोर्चा विद्यानंद बापट यांच्या प्रेरणेने निघालेल्या डीजेविरोधात मोर्चाला बापट यांना उपस्थित राहता आलं नाही, हे मुख्यमंत्री,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच मुंबई-नागपुरात पोलिसांनी डीजेविरोधात भूमिका घेतली आहे; मग पुण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, डीजे बंदीचे समर्थन संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. मिंध्यांचे दोन चार मंत्री सोडले तर गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांनी डीजे वाजवण्याला पाठिंबा दिला आहे. योगेश कदम यांनी आपल्या सोसायटीच्या आवारात डीजे वाजवत बसावं. काही दिवसांनी त्यांना हेच काम करावं लागणार आहे. गणेशोत्सव हा एक सांस्कृतिक उत्सव आहे. काल पुणेकर रस्त्यावर उतरले आणि त्या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे नेते होते. डीजेमुळे काय काय अपाय होतात, शारिरीक आणि मानिसिकदृष्ट्या कसा त्रास होतो हे प्रत्येकजण ओरडून सांगतोय. फडणवीस सरकारमधल्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की डीजे मुळे त्यांच्या भावाचं निधन झालं. वर्षा कदम या पुण्यातल्या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हातावर प्राण सोडले आणि गदारोळात वेळेवर रुग्णवाहिका पोहचू शकली नाही. असे विषय फक्त पुण्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातले आहेत. किंबहुना देशभरातले असतील. अशा वेळेला सामाजिक भावनेतून लोकं एकत्र आली असतील, तर त्याला पाठिंबा देणे हे सगळ्यांचे काम आहे. डीजे बंदीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. आणि फडणवीस नेहमीप्रमाणे कुंपणावर आहेत. मग फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कशाकरता आहेत? जर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एखाद्या सामाजिक प्रश्नावर कुंपणावर बसून मजा बघत असतील तर तुम्ही कायद्याचे राज्य चालवता असे कसे म्हणता येईल. नागपूरमधील पोलीस आयुक्तांनी डीजेबंदीचा आदेश काढलेला आहे. मुंबईत त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी भूमिका घेतलेली आहे. मग पुण्यातच का? मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे का? कालच्या मोर्चात विद्यानंद बापट उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांच्या जिवाला धोका आहे असं पोलिसांनी त्यांना सांगितलं म्हणून त्यांना त्या मोर्चाला येता नाही आलं. एका जागरूक नागरिकाच्या जिवाला धोका आहे असं पोलीस जाऊन सांगतात, आणि तुम्ही मोर्चात सहभागी होऊ नका असे सांगतात. हा गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा पराभव आहे. गृहमंत्र्यांना यासंदर्भात खुलासा करावा लागेल. पुण्यासारख्या शहरात सामाजिक प्रश्नांवर लढणाऱ्या एक कार्यकर्त्याच्या जिवीताला धोका आहे म्हणून तो या मोर्चाला येऊ शकत नाही. या मोर्चाची प्रेरणाच विद्यानंद बापट आहेत. ज्या पुण्यात नरेंद्र दाभोळकरांची हत्या होते, आता त्याच पुण्यात विद्यानंद बापट यांच्या जिवाला धोका आहे. भाजपने गुंडांच्या, सुपारी किलरच्या आणि खुनांच्या टोळ्या पाळल्या आहेत का? विद्यानंद बापट यांना धमक्या देणारे कोण आहेत? या राज्याचे गृहमंत्री अपयशी आहेत, हे मी वारंवार सांगतोय. या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री पाहिजे. मुख्यमंत्री कुंपणावर आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे ज्युनियर गृहराज्यमंत्री योगेश कदम डीजेचे समर्थन करत आहेत. मिंध्यांचे दुसरे मंत्री डीजेला विरोध करत आहेत. या सरकारमध्ये यादवी सुरू आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली तेव्हा मावळ्यांनी डीजे लावून आनंद साजरा केला नव्हता. मंडालेतून टिळकांची सुटका झाली तेव्हा तेव्हाही त्यांच्या स्वागतासाठी पुण्यात डीजे वाजला नव्हता. हे या नवसांस्कृतिक रक्षकांनी समजून घेतले पाहिजे की आपली संस्कृती काय आहे. राज ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे. ही आपली संस्कृती नाही आणि उत्तरेची संस्कृती इथे आणण्याची आपल्याला गरज नाही. महाराष्ट्राची संस्कृती महान आहे. या महान संस्कृतीवर कुणाचेही अतिक्रमण होता कामा नये, हे बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं आणि आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आमचंही हेच म्हणणं आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
ठाण्यामध्ये दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कोण नाचवत होतं? दहीहंडीच्या व्यासपीठावर हिडीस नृत्य कोण करत होतं? फडणवीसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. किंवा संस्कृतीच्या नावाने भाजपचे जे सुपारीकिलर फिरत आहेत त्यांना फडणवीसांना आवरायला हवं. जर आवरता येत नसेल तर फडणवीस हे कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहेत, असा घणाघातही संजय राऊत केली.
गेल्या 10 वर्षात भाजपनं काय केलं आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जय श्री राम आणि हिंदु खतरे मै है. हिंदु अजिबात खतरे मे नाही. हिंदु सुरक्षित आहेत. प्रतिहिंदुहृदयसम्राट नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. मूळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. महाराष्ट्रात चिल्लर हिंदुहृदयसम्राट आहेत, ते सांगतात म्हणून हिंदू खतऱ्यात नाही येऊ शकत. हिंदू जेव्हा जेव्हा धोक्यात आला तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने बलिदान केलेले आहे. आमच्यावर अयोध्येचे, बाबरीचे, मुंबईतल्या दंगलीचे खटले आहेत. काल पुण्यात जे लोक डीजेविरोधात उतरले, ते सुद्धा हिंदुत्वावादीच आहेत आणि त्यांनाही हिंदुत्ववादाचेही रक्षण करायचे आहे म्हणूनच ते रस्त्यावर उतरले आहेत. हे जरा मिस्टर मिंधे आणि त्यांच्या मंत्री आमदारांना समजवून सांगावं. आणि या राज्याचे मुख्यमंत्री जे कुंपणावर बसलेले आहेत, त्यांनी योग्य दिशेने उडी मारावी, असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपच्या 27 आणि शिंदे गटातील ९ नगरसेवकांचंजात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे. त्यांच्यावर कारवाई का नाही होत? विशाखा राऊत यांनी ज्या उमेदवाराला हरवलं त्यांच्याही जात प्रमाणपत्राची त्याचीही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, त्यांचंही प्रमाणपत्र रद्द होईल. एकतर्फी हा सगळा कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः जातपडताळणी अधिकाऱ्याला फोन करतात आणि सांगतात की यांचे प्रमाणपत्र रद्द करा आणि एकाला वाचवला म्हणून, असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.



























































