सत्या निकेतन इमारत दुर्घटनेवरून कन्हैया कुमारांचा भाजप सरकारवर निशाणा; ‘सरकारची जबाबदारी झटकण्याची भूमिका’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील सत्या निकेतन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी दिल्ली सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठात प्रचार करताना सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर त्या इमारतींचे ऑडिट करण्याची भाषा करत आहेत. ही सरकारची जबाबदारी झटकण्याची भूमिका असल्याचा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.

“गेल्या वर्षी प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हातात असलेल्या पत्रकात सर्वांसाठी वसतिगृहाचे आश्वासन देण्यात आले होते. आता सत्तेच्या पदावर आल्यानंतर ऑडिट करण्याची चर्चा केली जात आहे. जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी केली.

भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप करताना त्यांनी मात्र राजकारणाची पातळी इतकी खालावता कामा नये, असे म्हटले. विरोधी पक्षाची भूमिका सरकारला जाब विचारण्याची आणि सरकारला जबाबदार धरण्याची असते, असेही त्यांनी सांगितले.

कन्हैया कुमार म्हणाले की, “खरे राजकारण हे आहे की केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळते. ज्यांच्या मतांमुळे सरकार सत्तेत आले, त्यांच्या मुलांना पीजीमध्ये जीव गमवावा लागतो, तर त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात,” असे कन्हैया कुमार म्हणाले.