
इंडोनेशियातील अनाक क्राकाटाऊ या सक्रिय ज्वालामुखीचा अचानक भीषण उद्रेक झाला आहे. या उद्रेकानंतर हवेत तब्बल ५० हजार फुटांपर्यंत राखेचे प्रचंड लोट पसरले आहेत. या राखेमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियातील ८ प्रमुख विमानतळ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले असून तब्बल १,५५८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे सुमारे १ लाख ७० हजार प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून ते विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत.
जावा आणि सुमात्रा बेटांच्या दरम्यान असलेल्या सुंडा सामुद्रधुनीतील अनाक क्राकाटाऊ ज्वालामुखीमध्ये रविवारपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. इंडोनेशियाच्या भूगर्भीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेपासून या ज्वालामुखीमध्ये लागोपाठ अनेक मोठे स्फोट झाले. हवामान व भूभौतिकी संस्थेच्या अहवालानुसार, ज्वालामुखीतून राखेचे दोन मोठे थर हवेत फेकले गेले. त्यापैकी एक २० हजार फुटांपर्यंत पोहोचून जकार्ता आणि पश्चिम जावाच्या दिशेने सरकला, तर दुसरा अजस्त्र थर तब्बल ५० हजार फुटांपर्यंत उसळून लॅम्पूंग आणि बेंगकुलू भागावर पसरला.
हवेतील ही राख विमानांच्या इंजिनमध्ये शिरून मोठी दुर्घटना घडवू शकते, तसेच दृश्यमानता पूर्णपणे नाहीशी होते. याच हवाई सुरक्षेच्या कारणास्तव जकार्ता येथील सुकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हलीम पेरडानाकुसुमा यासह ८ विमानतळांवरील कामकाज तातडीने रोखण्यात आले. इंडोनेशियाचे वाहतूक मंत्री डुडी पुरवागंधी यांनी सांगितले की, वाऱ्याची दिशा आणि हवामान सातत्याने बदलत असल्याने उड्डाणे पुन्हा सुरळीत केव्हा होतील हे सांगणे सध्या कठीण आहे.
























































