आईच्या पाया पड आणि तुझ्या पापांबद्दल माफी माग… मालमत्तेच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा मुलाला सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालक आणि मुलामध्ये मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादासंदर्भातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात एक अनोखा प्रसंग घडला. मालमत्तेसाठी पालकांना त्रास देणाऱ्या मुलाची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा सल्ला दिला. आईच्या पाया पडून आपल्या पापांबद्दल माफी मागण्यास न्यायालयाने मुलाला सांगितले. न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि एन. के. सिंग यांचे खंडपीठ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

हिंदू धर्मात आईचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आईकडे जाऊन माफी मागावी आणि तिचे आशीर्वाद घ्यावेत, असे न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा म्हणाले.

हे प्रकरण आई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेशी संबंधित आहे. प्रेमापोटी पालकांनी मुलगा आणि सुनेला मालमत्तेच्या पहिल्या मजल्यावर भाड्याशिवाय परवानाधारक म्हणून राहण्याची परवानगी दिली. मात्र मुलगा आणि सून ही मालमत्ता आपल्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी पालकांवर दबाव टाकत छळ करू लागले.

मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेवर मालकी हक्क सांगितला, असा आरोपही पालकांनी केला. यानंतर पालकांनी वर्तमानपत्रात एक सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करून मुलासोबतचे संबंध तोडल्याची घोषणा केली. त्यांनी मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करून मालमत्ता खाली करण्याची मागणी केली. पालकांनी मालमत्तेचा ताबा परत मिळवण्यासाठी, कायमस्वरूपी मनाई हुकूम आणि नुकसान भरपाईसाठी कनिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला.

कनिष्ठ न्यायालयाने पालकांच्या बाजूने निर्णय देत मुलगा आणि सुनेला घर खाली करण्याचे निर्देश दिले. यानंतर मुलाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र दिल्ली उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. अखेर मुलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, जी न्यायालयाने फेटाळून लावली. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी मुलाला तोंडी सल्ला दिला की त्याने आपल्या आईकडे जाऊन माफी मागावी आणि तिचे आशीर्वाद घ्यावेत.