तेरा वेळा अपयशी ठरलेल्या कोकणातील तरुणाला चौदाव्या प्रयत्नात यश; देशसेवेचे स्वप्न पूर्ण, लेफ्टनंटपदी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है. पंख से कुछ नही होता. हौसलो में उड़ान होती. हिंदुस्तानच्या लष्करात जाऊन देशसेवेचे स्वप्न घेऊन धडपडणारा कोकणातील तरूण अनिकेत वाडकर हा सैन्य भरतीच्या परीक्षेत तब्बल तेरा वेळा अपयशी ठरला पण जिद्द आणि चिकाटी त्याने सोडली नाही आणि चौदाव्या प्रयत्नात तो यशस्वी झाला.कोकणचा सुपुत्र अनिकेत नीलेश वाडकर यांची हिंदुस्थानच्या सैन्यात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे.अनिकेतने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

कोकण रेल्वेत सेवेत असलेल्या निलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचा सुपुत्र कुमार अनिकेत निलेश वाडकर यांने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. लहानपणापासूनच सैन्यामध्ये निवड होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अनिकेतने उराशी बाळगले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्याच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि लेफ्टनंटपदी त्याची निवड झाली.

लहानपणापासूनच अनिकेतला सैन्य दलाची ओढ होती. सैनिकी गणवेश, शिस्त आणि देशसेवेची भावना यांच्याविषयी त्याला विशेष आकर्षण होते. शालेय जीवनात त्याने एनसीसी मध्ये प्रवेश घेतला आणि संरक्षण दलाच्या वातावरणाशी त्याचा अधिक जवळून परिचय झाला. त्यावेळी त्याच्या मनात एक स्वप्न आकार घेत होते.
एक दिवस हिंदुस्थानी लष्कराचा अधिकारी व्हायचे.

पदवीचे शिक्षण सुरू असताना त्याने त्या स्वप्नासाठी तयारी सुरू केली. पण पुढची जवळजवळ पाच वर्षे ही त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण परीक्षा ठरली. लेखी परीक्षांमध्ये अपयश आले. एसएसबी मध्ये अपयश आले. त्यानंतर दोन वेळा एसएसबी यशस्वीरीत्या पार करूनही अंतिम यादीत स्थान मिळाले नाही.पण त्याने चिकाटी सोडली नाही. तेरा वेळा प्रयत्न करुन अपेक्षित यश मिळाले नाही. पण तो खचला नाही निराश झाला नाही संघर्ष करत राहिला.

चौदाव्या प्रयत्नात त्याने मुलाखत, वैद्यकीय चाचणी आणि अखेर अंतिम यादीत स्थान पटकावत स्वप्न साकार केले. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्याने अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेतले. आणि 5 सप्टेंबर 2026 च्या दिवशी त्याने हिंदुस्थानच्या लष्कराच्या गणवेशात स्वत:ला पाहाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. त्याची हिंदुस्थानी लष्कराच्या क्रॉप्स ऑफ इंजिनियर मध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.