महिलेच्या शरीरयष्टीवरून टिप्पणी भोवली, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेले आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावरून प्रतिक्रिया देताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी काल मध्यरात्री ही कारवाई केली.

गेल्या आठवडय़ात चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने बुलढाणा शहरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवण्यात आले होते. याबाबत गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना, ‘बाप तो बाप है’ हे ठीक आहे. मात्र, एखाद्या पुरुषाने असे म्हटले तर चालेल; एखाद्या महिलेने ‘बाप तो बाप है’ असे म्हटल्यास ‘बापासारखे शरीर आणणार कुठून?’ अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. हे वक्तव्य केवळ विनोद किंवा सहज प्रतिक्रिया नसून, हेतूपुरस्सर महिलांना डिवचणारे असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

संतोष पंडितांना काही तासांत अटक होते, मग संजय गायकवाडांना का नाही?

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करणारे संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. गायकवाड यांनी आंबी कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करून जवळपास पाच महिने उलटत आले तरी त्यांना अटक झालेली नाही. मात्र सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांनी एक-दोन आक्षेपार्ह शब्द उच्चारताच त्यांना अटक केली. संतोष पंडितांना काही तासांत अटक होते. मग संजय गायकवाडांना का नाही, असा संतप्त सवाल प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांनी केला.