
>> राहुल गोखले
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत स्त्री हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान असणाऱया स्त्रीवादी नेत्या ग्लोरिया स्टायनम यांचे नुकतेच निधन झाले. स्त्राrमुक्तीवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱया स्टायनम यांच्यावर भारतीय विचारांचा विशेष प्रभाव होता.
ग्लोरिया स्टायनम यांच्या निधनाने आधुनिक स्त्रीवादाचा एक प्रखर आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंभर वर्षे जगण्याची त्यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही त्याप्रमाणेच स्त्रीहक्कांच्या बाबतीत अलीकडे अमेरिकेत घडय़ाळाचे काटे उलटे फिरवले जात असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्याची खंत त्यांना नक्कीच असणार.
स्त्रीमुक्ती चळवळीकडे स्टायनम तशा उशिराने वळल्या. तत्पूर्वी त्या स्वतस मानवतावादी म्हणवून घेत. त्यांच्या या भूमिकेचे बीज बहुधा त्यांच्या विस्कटलेल्या बालपणात असावे. आई लेखिका व वार्ताहर असली तरी नंतर त्यांना नैराश्याने गाठले व मानसोपचार घेण्याची त्यांच्यावर वेळ आली. वडील फिरस्ती वृत्तीचे होते आणि पत्नीला आलेल्या मानसिक अनारोग्यानंतर ते दोघे विभक्त झाले. स्टायनम यांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शाळेचे तोंड पाहिले नव्हते. खडतर बालपण त्यांच्या वाटय़ाला आले. नंतर स्टायनम यांनी शिक्षण घेतले आणि शिष्यवृत्ती घेऊन त्या ब्रिटनला गेल्या. तेथे त्या एका तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या, पण त्या नात्यापासून फारकत घेत त्यांनी भारतात जाण्याचे ठरविले. त्यांची आई व आजोबा हिंदू व बौद्ध धर्माचे अभ्यासक होते. त्याचा प्रभाव स्टायनम यांच्यावर होता. 1956 मध्ये त्या भारतात आल्या. देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर तसेच इंदिरा गांधींशी त्यांची भेट झाली. मानवेंद्र नाथ रॉय यांच्या अनुयायांच्या चर्चांत त्या सहभागी झाल्या. क्रांती म्हणजे हिंसक असलीच पाहिजे असे नाही, याची जाणीव आपल्याला तेथे झाली, असे त्यांनी म्हटले. विनोबा भावे यांच्या चळवळीचाही त्यांनी अनुभव घेतला. भारतातील वास्तव्याचा प्रभाव अमेरिकेला परतल्यावरही कायम राहिला.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत स्त्राr हक्कांच्या जाणिवा बाळसे धरू लागल्या होत्या. बेट्टी फ्रीडन, शर्ली चिझोलम, कीट मिलिट अशा कार्यकर्त्या स्त्राrवादाची पायाभरणी करीत होत्या. त्या काळात स्टायनम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून केली. ‘शो’ मासिकासाठी त्यांनी प्लेबॉय क्लबमध्ये अंडरकव्हर म्हणून काम केले. मेरी ऑच्स हे खोटे नाव वापरून; तीन इंचाच्या टाचेच्या चपला आणि घट्ट कपडय़ांमुळे होणारा त्रास सहन करीत 28 वर्षांच्या स्टायनम यांनी क्लबमधील पुरुषी मानसिकतेच्या जगात महिलांचे कसे शोषण होते, हे ‘अ बनीज टेल’ या वृत्तांतातून जगासमोर आणले. त्या लेखाने स्टायनम यांना प्रसिद्धी दिली; मात्र त्यांच्या आयुष्याला ध्येय मिळाले ते 1968 मध्ये त्यांनी कट्टर स्त्रीमुक्तीवादी महिला गटाच्या ‘स्पिक आऊट’ बैठकीत भाग घेतला तेंव्हा. त्या बैठकीत महिलांनी आपल्या बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या गर्भपातांवर अनुभव मांडले. वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वत केलेल्या बेकायदेशीर गर्भपाताची आठवण स्टायनम यांना त्यांच्याशी जोडता आली. त्या क्षणी त्या स्त्राrमुक्ती लढय़ाच्या पाईक झाल्या. प्रजनन स्वातंत्र्य हा एक मूलभूत मानवी हक्क आहे आणि स्त्राr मुक्तीचा तो खरा पाया आहे या भूमिकेचा त्यांनी पुरस्कार केला.
1972 मध्ये त्यांनी ‘मिस’ नावाचे महिलांसाठीचे मासिक सुरू केले. ते लवकरच बंद पडेल अशी शेरेबाजी टीकाकारांनी केली; पण ते अंदाज खोटे ठरवत पहिल्या अंकाचा खप तब्बल तीन लाखांपर्यंत पोहोचला. ‘इफ मेन कुड मेन्स्ट्रुएट’सारखे प्रक्षोभक वाटणारे लेख त्या मासिकात लिहून स्टायनम यांनी खळबळ माजवून दिली. पुरुषांना मासिक पाळी आली असती, तर समाजाने त्यास लाजेचे किंवा कमीपणाचे साधन मानण्याऐवजी शक्ती, पुरुषत्व आणि उच्च सामाजिक दर्जाचे प्रतीक म्हणून पाहिले असते. कारण शरीराची प्रक्रिया कोणाची यावर तिचे सांस्कृतिक महत्त्व अवलंबून असते असा त्यांचा युक्तिवाद होता. परिणाम असा झाला की जाहिरातदार हात आखडता घेऊ लागले. तेव्हा एकही जाहिरात नसलेले मासिक म्हणून ते प्रकाशित करण्याचे धाडस स्टायनम यांनी दाखविले. अर्थात आपल्या लढय़ाचे अनुकूल परिणाम झाकोळले जात असल्याचे स्टायनम यांना त्यांच्या हयातीतच पाहावे लागले. गर्भपाताला कायदेशीर स्वरूप देणाऱ्या 1973 सालच्या निकालाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच रद्दबातल ठरविले. अमेरिकेत कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होत असल्याचा युक्तिवाद केला जात असून ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांच्यासारखे सर्वोच्च पदावरील नेते महिलांनी तरुण वयात लग्न करण्याचा व जास्त मुलांना जन्म देण्याचा प्रचार करत आहेत. अलीकडेच ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील पीट हेगसेथ यांनी एका चर्चमधील व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये पाद्रय़ाने महिलांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याची मागणी केली होती. आपल्या सहा दशकांच्या लढय़ाची ही परिणती स्टायनम यांच्यासाठी वेदनादायी असणार यात शंका नाही.
ट्रम्प यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, असे विचारण्यात आले तेव्हा स्टायनम यांनी एका शब्दात उत्तर दिले होते- ‘रिझाईन‘ (राजीनामा द्या). हे त्यांच्या परखडपणाचे द्योतक.
ग्लोरिया स्टायनम यांच्या निधनाने अमेरिकन स्त्रीवादी चळवळीचा एक धगधगता चेहरा हरपला असला तरी त्यांचा वारसा नव्या पिढय़ांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही.
भारताचा प्रभाव
ग्लोरिया स्टायनम यांनी वेळोवेळी केलेली भाष्य टोकदार असे; पण त्यांच्या आयुष्यात काही विरोधाभासही होते. अजिबात विवाह करायचा नाही या स्त्राrमुक्तीवादी दृष्टिकोनाचा पुरस्कार करत असतानाच त्यांची अनेक प्रेमप्रकरणे गाजली. पुढे 2000 मध्ये त्यांनी डेव्हिड बेल यांच्याशी लग्न केले आणि अन्य स्त्राrमुक्तीवादी नेत्यांचा रोष ओढवून घेतला. स्टायनम या वलयांकित व्यक्ती असल्यामुळे कार्यावरील प्रकाशझोत व्यक्तीवर वळतो असा आक्षेप बेट्टी फ्रीडन यांच्यासारख्या स्त्राrवादी लढाईतील बिनीच्या शिलेदारांनी घेतला. अमेरिकन अभ्यासक व विद्यार्थ्यांनी भारतात प्रवास करावा यासाठी त्यांनी 1957 मध्ये भारत सरकारच्या विनंतीवरून ‘ए थाउजंड इंडियाज’ पुस्तक लिहिले होते. ‘मिस’ मासिकाच्या एका अंकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी अमेरिकन स्त्राr अष्टावधानी असते हे दर्शविण्यासाठी अष्टभुजा काली मातेच्या स्वरूपातील चित्र प्रसिद्ध केले होते हे भारताच्या त्यांच्यावर असणाऱया प्रभावाचे उदाहरण. ‘अॅन अनएक्स्पेक्टेड लाईफ’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होईल; पण ते पाहण्यास त्या नसतील.
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)
[email protected]



























































