
निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे, अनेकांना जखमी केल्याने नागरिक त्रस्त आहेत. बेजबाबदार नगरपंचायत प्रशासनाचा निषेध करीत बुधवारी युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रम रंधवे यांनी मुख्याधिकाऱ्यांना नोटांचा हार दिला, त्यांच्या टेबलावर कुत्रे सोडून संताप व्यक्त केला.
निफाड शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली असून, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा शिवसेना, युवासेनेने केली, याकडे निफाड नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने ही समस्या गंभीर होत आहे. याप्रश्नी युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रम रंधवे यांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेतली. प्लॅस्टिक गोणीत कुत्रे घेवून ते नगरपंचायतीत पोहोचले.
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलावर कुत्रे सोडले. नगरपंचायतीकडे पैसे नसतील किंवा भ्रष्टाचारामुळे तिजोरीत खडखडाट झाला असेल तर हे घ्या पैसे असे म्हणत मुख्याधिकाऱ्यांना नोटांचा हार भेट दिला. या आंदोलनावेळी नगरसेविका रुपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे, सचिन खडताळे आदी हजर होते. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्वरित उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

























































