
वाई तालुक्यातील बोपेगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या 26 वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही परंपरा सातत्याने जपत गावातील एकजूट, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जोपासला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या 26व्या वर्षपूर्तीचा मंगल सोहळा मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
बोपेगाव हे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे गाव असून, त्यांच्याच हस्ते गावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली होती. 26व्या वर्षपूर्तीनिमित्त उपस्थित राहून त्यांनी गणरायाची आरती केली. गेल्या 26 वर्षांपासून बोपेगावच्या ग्रामस्थांनी श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी जपत ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा पुढे नेली आहे. ही बाब निश्चितच अभिमानाची असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभयसिंह गायकवाड, उपाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, खजिनदार अनिल जाधव, सचिव जितेंद्र जाधव, अनुपम जाधव, क्षितिज जाधव, गौरव जाधव, अद्वैत जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


























































