
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईविरोधात अपील प्राधिकरणाकडे दाद मागा, असे आदेश देत उच्च न्यायालयाने उडिपी रेस्टॉरंटची याचिका निकाली काढली.
निकृष्ट दर्जाचे पनीर सापडल्याने एफडीएने या रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला होता. त्याविरोधात रेस्टॉरंटने याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एफडीएच्या कारवाईला आव्हान देण्यासाठी अपील प्राधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रशासनाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले.
ठाण्यातील या रेस्टॉरंटमधील पनीरचे नमुने एफडीएने घेतले. त्याचे परीक्षण करण्यात आले. या पनीरमध्ये दुग्धजन्य पदार्थांऐवजी चरबी अधिक आढळून आली. आरोग्यासाठी घातक असलेल्या या पनीरचा वापर होत असल्याने एफडीएने या हॉटेलचा परवानाच रद्द केला.




























































