
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 20 दिवसांपासून उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपले उपोषण स्थगित केले. आरक्षणासाठी सातारा गॅझेट लागू करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
उपोषण सोडले तरी आंदोलन सुरूच राहणार आहे. भविष्यात दगाफटका झाला तर थेट मुंबई गाठणार, असा इशाराही त्यांनी दिला. महायुती सरकारने आरक्षणाचे आश्वासन न पाळल्यामुळे जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्याची भूमिका जाहीर केली. त्यानुसार, मंगळवारी ते अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले. बुधवारी मध्यरात्री सरकारचे शिष्टमंडळ पाटोद्यात दाखल झाले. या शिष्टमंडळासोबत प्रदीर्घ चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले.



























































