
एअरलाइन्स कंपनी इंडिगोने आपल्या अनेक पूरक सेवांसाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. यामध्ये अतिरिक्त सामान, लहान मुलांची तिकिटे, पालकांशिवाय प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठीच्या सेवा आणि प्रायोरिटी चेक-इन व बोर्डिंग यांचा समावेश आहे. देशांतर्गत विमानांमधील अतिरिक्त सामानासाठीचे शुल्क प्रति किलो 700 रुपयांवरून 800 रुपये करण्यात आले आहे. यामुळे आता निर्धारित मर्यादेपलीकडे सामान नेण्यासाठी प्रवाशांना प्रति किलो 100 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
तीन दिवस ते दोन वर्षे वयोगटातील लहान मुलांच्या तिकिटाचे शुल्क 2000 रुपयांवरून 3000 रुपये करण्यात आले आहे. पालकांशिवाय प्रवास करणाऱ्या 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठीच्या ‘अनअकम्पनीड मायनर’ (Unaccompanied Minor) सेवा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत विमानसेवेसाठी हे शुल्क 5000 रुपयांवरून 5999 करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी या सेवेचे शुल्क 12,999 आहे.
फास्ट फॉरवर्ड सेवाही महाग
इंडिगोच्या फास्ट फॉरवर्ड सेवा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत विमानसेवेसाठी हे शुल्क 500 रुपयांवरून 650 रुपये करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी हे शुल्क प्रति सेक्टर 850 रुपये आहे, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

























































