राजस्थानमध्ये नगर पालिका निवडणुकांसाठी कोटींची लाच दिली जात आहे; अशोक गेहलोत यांचा भाजपवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील नगर निकाय निवडणुकांदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी भारतीय जनता पक्षावर आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एक आयएएस अधिकारी भाजपचे बोर्ड स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर आणि एसडीएमवर दबाव टाकत असल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे.

सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, राजस्थानमध्ये लोकशाहीची उघडपणे लूट सुरू आहे. भाजपचे महापौर बसवण्यासाठी अपक्ष आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना कोटी रुपयांची लाच वाटली जात आहे. जे नगरसेवकर याला विरोध करत आहेत, त्यांना पोलिसांच्या माध्यमातून जबरदस्तीने उचलून नेले जात असून धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

जनतेच्या खिशावर दरोडा

जे लोक कोट्यवधी रुपये खर्च करून महापौर किंवा अध्यक्ष बनतील, ते लोकांची सेवा करतील की, आपला खर्च वसूल करण्यात लागतील, असा सवाल गेहलोत यांनी उपस्थित केला. ही लाचेची रक्कम पुढे रस्ते, ड्रेनेज आणि सार्वजनिक कामांच्या फाईल्समधून वसूल केली जाईल. ज्यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागेल. ही केवळ राजकारणाची बातमी नसून थेट जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे, असे म्हणत त्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.