कामाठीपुरा समूह पुनर्विकासाला दिवाळीचा मुहूर्त! भगीरथी हाऊसिंग आणि माथी डेव्हलपर्ससोबत म्हाडाचा करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज महत्त्वपूर्ण गती मिळाली. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत बांधकाम आणि विकास (C&DA) पद्धतीने राबविण्यात येणाऱया या प्रकल्पासाठी भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत आज करार करण्यात आला. या करारामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

सुमारे 34 एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक 1 ते 15 मध्ये प्रस्तावित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुमारे 475 उपकरप्राप्त आणि 259 बिगर-उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये सुमारे 6,625 निवासी आणि 1,376 बिगरनिवासी भाडेकरू, तसेच सुमारे 800 जमीनमालक या प्रकल्पाशी संबंधित आहेत. या भागातील भूखंड आकाराने लहान व अरुंद असल्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक पंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

म्हाडाला लॉटरीसाठी मिळणार 900 घरे

कामाठीपुरा समूह पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे 44,000 चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, यामधून सुमारे 900 अतिरिक्त घरांची निर्मिती प्रस्तावित आहे.

रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर

या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यमान पात्र रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्यात येणार असून पात्र भाडेकरूंना 500 चौ.फू. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा यात समावेश आहे.

असे मिळणार भाडे

बिगरनिवासी गाळेधारकांसाठी क्षेत्रफळानुसार वाढीव भाडय़ाची तरतूद करण्यात आली आहे. 200 चौ.फू.पर्यंत 25,000 रुपये, 200 ते 400 चौ.फू. क्षेत्रासाठी 30,000 रुपये आणि 400 चौ.फू.पेक्षा अधिक क्षेत्रासाठी 35,000 रुपये प्रतिमाह भाडे देण्यास मान्यता देण्यात आली आहे.