मंत्रिमंडळात बशे बैल बसवले आहेत, ते लोकांना काय न्याय देणार? उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासासंदर्भात जाब विचारतानाच शेतकरीविरोधी महायुती सरकारवर आज कडकडीत आसूड ओढले. दुष्काळ आ-वासून उभा आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त हवा आहे का, असा सवाल त्यांनी केला. लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने बशा बैल देऊन फसवले तसे बशे बैल मंत्रिमंडळात बसवले आहेत, ना त्यांचा शेतीला उपयोग, ना कशाला! ते लोकांना काय न्याय देणार, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

महायुती सरकारच्या काळात मराठवाडय़ाचा विकास खुंटला आहे. त्याबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘मराठवाडय़ाचा विकास, तुमसे ना हो पायेगा’ आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयासमोर धरणे धरण्यात आले. या आंदोलनाच्या समारोपावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी सरकारची सालटीच लाढली.

मराठवाड्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही आंदोलन उभे केले आहे, आपले दयाळू पंतप्रधान तुम्हाला माफ करतील, अशी उपरोधिक टोलेबाजी करतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री टीका करतात, पण शिवसेनेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, असे आव्हान त्यांनी दिले.

आमदार-खासदार खरेदी केले, आता पुरस्कार विकत घेताहेत

मराठवाडय़ाकडे कोणाचेही लक्ष नाही. मुख्यमंत्री दिल्लीला पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करायला गेलेत. एक उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गुजरातेत गेलेत. त्यांनी तर लंडनमध्ये एक पुरस्कार विकत घेतला. आमदार, खासदार खरेदी करून झाले… आता पुरस्कार खरेदी करत आहेत. ‘तुमसे ना हो पायेगा’ असे ते आपल्यालाच म्हणतील, असा सणसणीत टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी प्राण पणाला लावले. एक जरांगे आहेत, ते लढताहेत अन् दुसरे नेते लंडनमध्ये पुरस्कार विकत घेत फिरताहेत, असे ते म्हणाले.

कुठे सरदार पटेल, कुठे हे…!

निजामाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी मराठवाडय़ाने मोठा संघर्ष केला. रझाकारांशी तर रक्तरंजित संघर्ष झाला. अनेकांनी आत्माहुती दिली. लढा ऐन निकरावर आला असताना जिना गेले. सरदार पटेलांनी ऑपरेशन पोलो सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी एक जुलमी राजवट संपवण्यासाठी फौजा घुसवल्या. तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी फौजा घुसवल्या, असा स्पष्ट आरोप या वेळी उद्धव ठाकरे यांनी पेंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर केला.

जाहिरातींसाठी पैसा आहे, पण मराठवाड्यासाठी नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज वर्तमानपत्र पाहिले तर पहिल्या पानावर गद्दाराची जाहिरात! एवढय़ा जाहिरातींचे बिल केले तर मराठवाडय़ातील एखादा प्रकल्प नक्कीच पूर्ण झाला असता, मराठवाडय़ाचे कल्याण झाले असते, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले. ते गरीब शेतकरी आहेत, हेलिकॉप्टरने शेतात जातात, तुम्ही श्रीमंत आहात, असा टोलाही त्यांनी
लगावला.

भाजपच्या सत्तेचेच लोडशेडिंग करा

लाडकी बहीण योजनेतून 91 लाख महिला बाद केल्या. या योजनेत पाच हजार कोटींचा घोटाळा केला. अखंड वीज देणार असे मुख्यमंत्री घसा कोरडा करून सांगत होते. पण आता ऐन दुष्काळात लोडशेडिंग सुरू केले आहे, असा घणाघात करतानाच, भाजपच्या सत्तेचे लोडशेडिंग करा, खंडित करा त्यांची ‘पॉवर’! तोपर्यंत मराठवाडय़ाला न्याय मिळणार नाही, असे खडे बोल या वेळी उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य कायम

मराठवाडा ही राजकीय नेत्यांची खाण आहे. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, डोणगावकर असे मातब्बर नेते या मातीने दिले. याच मातीतून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते जन्माला आले. प्रमोद महाजन यांच्याकडे तर आपण भावी पंतप्रधान म्हणून पाहत होतो. गोपीनाथ मुंडे यांनी तर एक दिवसही सत्तेचा उपभोग घेतला नाही. मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. मुळात मराठवाडय़ाला नेताच ठेवायचा नाही असे दिसते. त्यामुळे आता लोकांनीच नेते व्हावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या वेळी व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई व आमदार अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील, कैलास पाटील, डॉ. प्रवीण स्वामी, माजी आमदार मीरा रेंगे-पाटील, उपनेते सुभाष पाटील, लक्ष्मण वडले, महिला आघाडीच्या ज्योती ठाकरे, राज्य संघटक चेतन कांबळे, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, महेश नलगे, गणेश केरकर, उल्हास गिराम, रणजीत पाटील, बालाजी रेड्डी, जोतिबा खराटे, भुजंग पाटील, बबन बारसे, संदेश देशमुख, गोपू पाटील, रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे आदींची उपस्थिती होती.

निजामासारख्या बलाढय़ संस्थानिकाला मराठवाडय़ाने शरण आणले. अनन्वित अत्याचार करणाऱया रझाकारांना पळता भुई थोडी केली. हा लढणारा मराठवाडा रडणारा कधीपासून झाला? संघर्षाचे बीज या मातीच्या कणाकणात रुजलेले आहे. लढण्यासाठी एकत्र या, आवाज उठवा! शिवसेना तुमच्यासोबत आहे.

पुढचे आंदोलन 23 सप्टेंबरला विदर्भात

मराठवाडय़ातील हे आंदोलन म्हणजे सुरुवात आहे. मी पुन्हा मराठवाडय़ात येणारच आहे. शिवसेनेचे पुढचे आंदोलन 23 सप्टेंबरला विदर्भात होणार आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

निष्ठा विकलेल्यांनी आता दुष्काळावर आवाज उठवावा

दुष्काळ आहे म्हणून सरकार हातावर हात धरून बसले आहे. शेतकऱयांना शेतीला पूरक असा जोडधंदा द्या. दुधाळ जनावरांचे वाटप करा. सोयाबीन प्रकल्प सुरू करा. म्हणजे सोयाबीनला भाव मिळेल, अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी मांडली. मराठवाडय़ात कापूस पिकतो, पण सूतगिरण्या आहेत का? काwशल्य विकास होतोय का? वरून अस्मानी अन् खालून सुलतानी संकट आहे. विकासाच्या नावाखाली निष्ठा विकलेल्या खासदार, आमदारांनी आता दुष्काळावर आवाज उठवावा, असे आव्हान या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्र बहुभाषिक म्हणण्याची हिंमतच कशी होते?

महाराष्ट्राला बहुभाषिक बोलणाऱया अमित शहा यांच्यावर शरसंधान करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा गद्दारांचे नेते असा उल्लेख केला. ते म्हणाले की, गद्दारांचे नेते अमित शहा कालपरवा मुंबईत आले होते. मुंबईत येऊन ते महाराष्ट्र बहुभाषिक आहे असे म्हणाले आणि या वेळी त्यांच्या बाजूला गद्दार बसले होते! सत्तालंपट! हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. महाराष्ट्र बहुभाषिक आहे, असे म्हणण्याची हिंमतच कशी झाली, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. गुजरात, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये जाऊन असे बोलण्याची हिंमत आहे का, अशी चपराकही त्यांनी लगावली.

मित्रांचे कर्ज माफ, शेतकरी वाऱ्यावर

यूपीआय पेमेंटवरील करावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सुभाष चंद्रा नावाचे यांचे एक मित्र आहेत. त्यांचे 22 हजार कोटींचे कर्ज माफ केले. पण शेतकऱयांना देण्यासाठी या दयावान सरकारकडे खडकू नाही. जातीजातींना आपसात लढवायचे आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या एवढाच उद्योग भाजपला माहिती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप पुढची सत्ता बघणार नाही

मुख्यमंत्री आज पुन्हा बोलले, पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही! दुष्काळ काय मराठवाडय़ाला नवीन आहे का? आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगा, भाजप पुढची सत्ता बघणार नाही म्हणून! बघा कसे गुडघ्यावर रांगत येतील, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना केले. सरकार लवकरच मराठवाडय़ात पंचनामे सुरू करणार आहे. त्यावर जातीने लक्ष ठेवा, शेतकऱयांना एकत्र करा. एकीचा दुष्काळ संपवा, सरकार आपोआप तुमच्या चरणावर लोळण घेईल. संघर्षाची साथ सोडू नका, शिवसेना तुमच्या सोबत आहे, असा शब्दही या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

शेतकरी आत्महत्यांसाठी सरकारचीच सीबीआय चौकशी करा

‘मराठवाडय़ाच्या विकासाचा अनुशेष 60 हजार कोटींवर गेलाय आणि कॅबिनेटला चिंता वाटतेय! कर्नाटकाने 27 ऑगस्टलाच दुष्काळ जाहीर केलाय. त्यांनी आता मदत द्यायलाही सुरुवात केली, महायुती सरकार काय मुहूर्ताची वाट पाहतेय का? आम्ही पंचांगवाले, मुहूर्त बघतो, 5 ऑक्टोबरचा मुहूर्त आहे’ अशी नक्कल उद्धव ठाकरे यांनी करताच एकच हशा पिकला. खड्डय़ात घाला तुमचा तो मुहूर्त, शेतकऱयाच्या मरणाची वाट बघताय का, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. दुष्काळ जाहीर करेपर्यंत होणाऱया शेतकरी आत्महत्यांना कोण जबाबदार? खरे तर शेतकरी आत्महत्यांसाठी या सरकारचीच सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.