
मदतीच्या बहाण्याने विवाहित तरुणीला फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर भाजपचा माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांनी गँगरेप केल्याची घटना संतापजनक घडली आहे. भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हा प्रकार घडला. त्या पीडितेला शस्त्राचा धाक दाखवत तिला दारू पाजून तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनंतर पडघा पोलीस ठाण्यात पाटील व पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेच का भाजपचे पार्टी विथ डिफरन्स असा संतप्त सवाल कल्याण डोंबिवलीकरांनी केला आहे.
22 वर्षीय विवाहितेचा आपल्या पतीसोबत वाद झाला होता. तो मिटवण्याबाबत तिने भाजपचा माजी आमदार नरेंद्र पवार याला साकडे घातले. पवार याने मध्यस्थी करण्यासाठी त्या तरुणीला 13 सप्टेंबर रोजी आपल्या कार्यालयात बोलावले होते. मात्र गर्दीत फार बोलता येणार नाही, असे सांगून तिला आपल्या कारमधून भिवंडीच्या बापगाव येथे बडतर्फ पोलीस शैलेश पाटील याच्या मालकीच्या फार्महाऊसवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप त्या पीडित विवाहितेने केला आहे. रात्री दोनच्या सुमारास नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यानेही पहाटे चारच्या सुमारास तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिच्या घरी नेऊन सोडले.
48 तासात अटक न केल्यास आंदोलन
विवाहितेवर बलात्कार करणारा भाजपचा माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस शैलेश पाटील या दोघांना 48 तासांच्या आत अटक करा अन्यथा आपण असंख्य महिलांसोबत पडघा पोलीस ठाण्याबाहेर जाऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा काँग्रेसच्या नगरसेविकेने दिला आहे.
व्हिडीओ मोबाईल चॅट्सचा पुरावा
पीडितेने काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे धाव घेत मदत मागितली. तिने कुलकर्णी यांना काही व्हिडीओ व मोबाईल चॅट्सही दाखवले. त्यानंतर नगरसेविकेने पीडितेसह थेट पडघा पोलीस ठाणे गाठले आणि नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
सरकारने मला न्याय द्यावा
शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे असल्यानेच मी तक्रार देण्याची हिंमत दाखवली. सरकारने मला त्वरित न्याय द्यावा, अशी भावना पीडितेने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गीर यांनी सांगितले.


























































