
केरळमच्या इडुक्की येथील संथानपारा भागात रानहत्तीच्या हल्ल्यात मध्य प्रदेशातील एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.मृत व्यक्तीची ओळख शिवकुमार अशी पटली आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील रहिवासी होता आणि येथे एका वेलचीच्या मळ्यात काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवकुमार आणि त्याचा मित्र संथानपारा येथील ‘नजंगलार-कंपनी इस्टेट रोड’वरून चालले होते. त्यावेळी त्या भागात भरकटलेल्या एका रानहत्तीनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवकुमारचा मित्र तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र हत्तीने शिवकुमारवर हल्ला केला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
हत्ती निघून गेल्यानंतर स्थानिक रहिवासी घटनास्थळी जमा झाले आणि त्यांना शिवकुमार मृत अवस्थेत आढळला, असे पोलिसांनी सांगितले.संथानपारा पोलिसांनी शुक्रवारी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.
स्थानिक रहिवाशांनी आरोप केला की, या भागात रानहत्ती वारंवार घरांच्या जवळ येतात आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय शोधला गेलेला नाही. वनविभागाचे अधिकारी हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याला पुन्हा जंगलात परत पाठवण्यासाठी पावले उचलत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.




























































