राज्य सरकार पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत, ते काय दुष्काळ निवारण करणार? संजय राऊत यांचा जोरदार टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पावसाने पाठ फिरवली असून अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. अशा वेळी राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहे, ते काय दुष्काळ निवारण करणार असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच मोदींचे सत्तास्थान आणि राजयोग जाईल अशी भिती भाजपच्या लोकांना वाटते म्हणून त्यांनी हे उपचार आणि उपाय म्हणून हे दिव्यांची पेटवा पेटवी केली आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकार पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत, ते काय दुष्काळ निवारण करणार? मोदींना दीर्घायुष्य लाभावं म्हणून दिवे पेटवले जात आहेत. मोदींची ग्रहदिशा कालपासून बदलताना दिसत आहे. यातून मोदींना राजकीय आणि मानसिक स्थैर्य लाभावं म्हणून एका ज्योतिषाने सांगितलं आहे की लाखो दिवे पेटवा. आणि त्यातून ती ऊर्जा मोदींपर्यंत गेली तर मोदी स्थिर राहतील. त्यासाठीच काल दिवे पेटवले, लाखो टन कापूर वाटला, दिवे पेटवायला लाखो लिटर तेल दिलं. अनेक राज्यांनी दिवे पेटवायला सरकारी खर्च दिला. या सगळ्यात दुष्काळग्रस्तांकडे पाहण्यासाठी कुणाला वेळ आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार काल दिवसभर दिवे पेटवत होते. त्या आधी 15 दिवस हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी झटत होते. मोदी सांगत होते की तेल जपून वापरा आणि स्वतःच्या वाढदिवसाला लाखो लिटर आणि कापूर जाळला जातोय त्याकडे त्यांचं लक्ष नाहिये. मी अंधश्रद्धाळू नाही. पण मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. मोदींचे राहू, केतू, शुक्र हे ग्रह बिघडलेले आहेत. मोदींचे सत्तास्थान आणि राजयोग जाईल अशी भिती भाजपच्या लोकांना वाटते म्हणून त्यांनी हे उपचार आणि उपाय म्हणून हे दिव्यांची पेटवा पेटवी केली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आपल्या आगामी पुस्तकाबद्दल संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मराठी वाचकांसाठी आणि रसिकांसाठी हे पुस्तक आहे. माझा जो पत्रकारितेतला प्रवास मोठा आहे. मी स्वतःला कधी विचारवंत किंवा बुद्धीवंत समजलो नाही. किंबहुना बाळासाहेब म्हणायचे की बुद्धिजीवी ही शिवी आहे. पण मी अखंडपणे लिहितो, वाचतो, बोलतो. त्यातून काही गोष्टी सुचतात. वाचलेल्या गोष्टी इतर लोकांपर्यंत जाव्यात याच भावनेतून बोध किर्तन हे पुस्तक लिहिले आहे. हळूहळू या पुस्तकाविषयी आपल्याला माहिती मिळेलच, असेही संजय राऊत म्हणाले.