
पैशांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या अन्नात विष कालवणाऱ्या भेसळखोरांविरोधात एफडीएची कारवाई जोरात सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ६२८ दुकानांची झाडाझडती घेत अन्नपदार्थ तपासण्यात आले. यामध्ये अनेकांना नोटिसा बजावतानाच १९ भेसळखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ९ लाख ४७हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. एफडीएच्या या दणक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली. या तपासण्यांदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२९ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांत आठ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ३१० अन्न नमुने तपासण्यात आले. यापैकी चार नमुने अप्रमाणित तर चार नमुने असुरक्षित आढळल्याने संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ८७ लाख ५८ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ९ लाख ४७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कारवाईने धाबे दणाणले
प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या विक्रीविरोधात जिल्ह्यात ३९ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही दोन कारवाया करण्यात आल्या. भेसळयुक्त असल्याचा संशय असलेले तसेच विनापरवाना विक्री होत असलेले १ हजार ६९६ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. या पदार्थांची किंमत सुमारे ८४ हजार रुपये आहे. विविध प्रकरणांत ११३ जणांवर दंडात्मक कारवाई करून ९ लाख ४७ हजार रुपयांचा दंड शासनजमा केला आहे




























































