
काळाचौकी येथे विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पाऊल उचलले आहे. गणेश मंडळांची सजावट आणि रोषणाई कितीही आकर्षक असली तरी त्यापेक्षा भाविकांचा जीव मौल्यवान आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेत कोणतीही तडजोड करू नका, असे आवाहन समन्वय समितीने गणेश मंडळांना केले आहे.
प्रत्येक मंडळाने बेस्ट प्रशासनाने दिलेल्या विद्युत सुरक्षा सूचनांचे तातडीने पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. संपूर्ण विद्युत यंत्रणेचा ‘कनेक्टर लोड’ मंजूर भाराच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावा, मुख्य तारा, केबल्स, स्विचेस, एमसीबीएस, ईएलसीबी आदींची क्षमता कनेक्टेड लोडच्या प्रमाणात असावी, प्रत्येक विद्युत उपकरणासाठी योग्य व स्वतंत्र आार्ंथग व्यवस्था असावी, प्रत्येक विद्युत जोडणीसाठी ईएलसीबी बसविणे अनिवार्य असून त्याची कार्यक्षमता तपासून घ्यावी, सर्व मुख्य तारा पीव्हीसी इन्सुलेशन असलेल्या असाव्यात, मुख्य तारांमध्ये शक्यतो कोणतेही जोड देऊ नयेत, विद्युत यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घ्यावी तसेच पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या विद्युत जोडण्या, स्टॉल, प्रकाशयोजना किंवा उघडय़ा तारांची व्यवस्था राहणार नाही, याची प्रत्येक मंडळाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.



























































