
फोर्ट येथील फोर्टचा इच्छापूर्ती गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उभारलेले प्रति बालाजी मंदिर भक्तांचे आकर्षण बनले आहे. फोर्टच्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेताना साक्षात तिरुपती मंदिरात असल्याचे जाणवत असून त्यामुळे मंडळाने उभारलेले मंदिर भक्तांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.
फोर्टच्या इच्छापूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सालाबादप्रमाणे यंदाही आकर्षक देखावा उभारण्याची परंपरा कायम ठेवली. यंदा मंडळाने हुबेहूब तिरुपती बालाजीचे मंदिर साकारले आहे. मंदिराची रचना, सजावट आणि त्यामागील धार्मिक वातावरण यामुळे हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. यामुळे भाविकांना प्रत्यक्षात बालाजी मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेत असल्याचा भाव अनुभवण्यास मिळत आहे. परिणामी भाविक कुटुंब कबिल्यासह फोर्टच्या राजाचे दर्शन घेण्याबरोबर बालाजी मंदिर बघण्याचा आनंददेखील लुटता येत आहे. राकेश गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करून हे बालाजी मंदिर उभे केले असून अध्यक्ष रवी सुर्वे व सचिव रूपेश सुर्वे यांनी मजबूत पाठबळ दिले आहे. यापूर्वी मंडळाने पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, 12 ज्योतार्ंलग, 11 मारुती आणि 21 गणपती अशा विविध धार्मिक संकल्पनांवर आधारित देखावे साकारले आहेत.




























































