
‘काही गोष्टी काळासोबत बदलतात, पण काही आठवणी काळाच्या पलीकडे जिवंत राहतात’ या भावूक संदेशासह ‘पार्ले टिळक विद्यालय’च्या 105 वर्षांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देणारा विशेष देखावा विलेपार्लेत साकारण्यात आला आहे. विलेपार्लेच्या हनुमान रोडवरील पितळेवाडी परिसरात राहणाऱ्या रोहित तोस्कर यांनी हा देखावा साकारला असून त्यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षणासोबतच पिढय़ा घडवणारी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आठवणींचा साक्षीदार असलेली ‘पार्ले टिळक विद्यालय’ ही संस्था आजही हजारो माजी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्थान राखून आहे. या संस्थेच्या 105 वर्षांच्या प्रवासावर आधारित देखाव्यात जुन्या वास्तूपासून ते आताच्या आधुनिक इमारतीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या देखाव्यात शाळेतील वर्ग, बाकडे, वह्या पुस्तक, घंटा वाजवणारा शिपाई, विद्यार्थी, खिडक्या, शाळेचे पटांगण, शाळेची जुनी व नवीन वस्तू, मराठी शाळा वाचवा असा संदेश देणारा विद्यार्थी आणि शाळेचा मराठी माध्यम ते इंग्रजी माध्यमांपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘काळ बदलू द्या, शिक्षणाची माध्यमे बदलू द्या, इमारती बदलू द्या… पण आपल्या मातीशी, आपल्या भाषेशी, संस्पृतीशी आणि माणसांशी जोडलेले नाते कधीही तुटू देऊ नका.’ असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून तोस्कर यांनी दिला आहे.




























































