
खेतवाडी 13वी लेन सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ यंदा 57 व्या वर्षातील गणेशोत्सव साजरा करीत आहे. ‘मुंबईचा अनंत’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या गणरायाच्या दरबारात कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे गणेशभक्त देखावा पाहून थक्क होत आहेत.
खेतवाडीतील गणेशमूर्ती त्यांच्या भव्यतेसाठी आणि अप्रतिम मूर्तिकलेसाठी मुंबईत प्रसिद्ध आहेत. ‘मुंबईचा अनंत’ गणरायाचे खेतवाडी 13वी लेन सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ हे त्यापैकीच एक लोकप्रिय मंडळ आहे. दरवर्षी वेगवेगळय़ा मनमोहक रूपांतील, विशेषतः पौराणिक व पारंपारिक वेशातील गणराया पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करतात. मंडळाने या वर्षी कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा देखावा साकार केला आहे. गणरायाची मूर्तीही महालक्ष्मी अंबाबाईच्या रूपात असून 22 फूट उंचीची आहे. मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे गणेशमूर्ती ‘शुभ्र श्वेत’ रंगात असते. या वर्षी प्रसिद्ध मूर्तिकार पुणाल पाटील यांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे. मंडळातर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि प्रत्येक रविवारी अन्नदान केले जाते, असे मंडळाचे सचिव चंदन माने यांनी सांगितले.





























































