कबुतरखान्यासाठी जैन समाजाची उपोषणाची धमकी, मुनींच्या इशाऱ्यानंतर वाद चिघळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले कबुतरखाने पुन्हा उघडले जावेत यासाठी जैन समाज पुन्हा पुढे सरसावला आहे. जैन मुनी नीलेशचंद्र महाराज यांनी सर्व कबुतरखाने तत्काळ उघडा अन्यथा आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा दिला आहे. मुनींच्या या इशाऱ्यानंतर कबुतरखान्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जैन मुनी नीलेशचंद्र आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची रविवारी एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली. त्यावेळी त्यांनी मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्दय़ावरून महायुती सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानावर जैन समाजाने आंदोलन केले होते. त्यावेळी ‘कबुतरांना न्याय दिला जाईल’ असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आजही मुंबईतील सर्व कबुतरखाने बंदच आहेत, असा आरोप नीलेशचंद्र यांनी केला. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री लोढा जैन समाजाचा आवाज दाबताहेत

नीलेशचंद्र यांनी यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही टीका केली. लोढा हे मुंबईतील जैन समाजाचा आवाज दाबत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुक्या जिवांना तडफडत मरताना पाहणे हीसुद्धा हिंसाच

शहरातील सर्व कबुतरखान्यांमधील दाणा-पाणी बंद आहे. मुक्या जिवांना असे तडफडत मरताना पाहणे हीसुद्धा एक हिंसाच आहे, कबुतरखाने तत्काळ उघडले गेले नाहीत, तर गोडीजी मंदिरासमोर भव्य आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा नीलेशचंद्र यांनी यावेळी दिला. न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, आता जैन समाज कुणाचेही ऐकणार नाही, असेही ते म्हणाले.