
गतविजेत्या हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेची दाणादाण उडवली. ‘अ’ गटातील या सामन्यात हिंदुस्थानने श्रीलंकेचा तब्बल 16-1 असा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळविला. हिंदुस्थानकडून जुगराज सिंहने चार गोल केले, तर अभिषेक आणि दिलप्रीत सिंह यांनी गोलची हॅटट्रिक केली.
पहिल्याच मिनिटापासून श्रीलंकेवर हल्लाबोल
हिंदुस्थानने पाचव्या मिनिटालाच खाते उघडले. जरमनप्रीत सिंहच्या सुरेख चालीवर मंदीप सिंहने गोल केला. दहाव्या मिनिटाला जुगराजने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. पुढच्याच मिनिटाला अभिषेकने गोल करत हिंदुस्थानची आघाडी 3-0 केली. हरमनप्रीतने 16 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर अभिषेकने 17 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. जुगराजने 22 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर साधत हिंदुस्थानला 6-0 अशी आघाडी मिळवून दिली. सुखजीतने 29 व्या मिनिटाला गोल केला आणि त्यानंतर अवघ्या एका मिनिटात दिलप्रीतने गोल करत मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानला 8-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
तिसऱया सत्रातही गोलांची आतषबाजी
मनप्रीतने 31 व्या मिनिटाला जोरदार फटका मारत गोल केला. विवेक सागर प्रसादने 36 व्या मिनिटाला बॅकहॅण्डवरून अप्रतिम गोल केला. दिलप्रीतने 38 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल केला. 42 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत जुगराजने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. हरमनप्रीतने 45 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल करत हिंदुस्थानची आघाडी 13-0 वर नेली.
शेवटच्या सत्रातही श्रीलंकेला दिलासा नाही
अभिषेकने 49 व्या मिनिटाला गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. श्रीलंकेला 50 व्या मिनिटाला सुरेश रत्नायकेच्या गोलमुळे एकमेव दिलासा मिळाला. यानंतर जुगराजने 53 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत वैयक्तिक चौथा गोल नोंदवला. त्यानंतर दोनच मिनिटांनी दिलप्रीतने गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि हिंदुस्थानने 16-1 असा धडाकेबाज विजय साकारला.






























































