जनता अर्बन बँकेवर चार दशकांनंतर सत्तांतर, परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
wai-janata-urban-cooperative-bank-election-results-parivartan-panel-wins-historic-power-shift-after-four-decades-suresh-korde-defeated

वाई येथील जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सुरेश कोरडे यांच्या संस्थापक पॅनेलचा पराभव करत खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे बँकेच्या सत्ताकारणातील कोरडे यांची चार दशकांची सत्ता उलथवून टाकण्यात परिवर्तन पॅनेलला यश आले आहे.

या निवडणुकीत 9700 सभासदांपैकी 5260 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्थापक पॅनेल विरुद्ध परिवर्तन पॅनेल अशी थेट लढत झालेल्या या अटीतटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी सरासरी सुमारे 1600 मतांच्या मताधिक्याने विजय संपादन केला. वाई शहर व तालुक्यातील मतदारांचा कौल परिवर्तन पॅनेलच्या बाजूने राहिला. विविध मतदारसंघांमध्ये परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेल्या मोठय़ा मताधिक्यामुळे संस्थापक पॅनेलला अखेर सत्तेतून बाहेर राहावे लागले.

या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून राहुल डेरे (कवठे), महेंद्र जमदाडे (फुलेनगर), तानाजी जाधव (विठ्ठलनगर), सुभाष नवले (सातारा), शेखर फरांदे (ओझर्डे) आणि नीळकंठ मोरे (पाचवड) हे विजयी झाले आहेत. तसेच महिला राखीव मतदारसंघातून वैशाली नीलेश चव्हाण (सुरूर) आणि रेखा संतोष पिसाळ (व्याजवाडी) यांनी, तर ओबीसी राखीव प्रवर्गातून बाळकृष्ण भिकोबा सपकाळ यांनी विजय मिळवला. अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदारसंघातून गायकवाड अजय जगन्नाथ हे विजयी झाले. भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून तात्याबा धायगुडे (वाघोशी, ता. खंडाळा) हे बिनविरोध निवडून आले होते.

उर्वरित 10 जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने मिळवलेल्या स्पष्ट आघाडीमुळे बँकेच्या आगामी राजकारणात मोठा बदल झाला आहे. दीर्घकाळ बँकेवर प्रभाव टिकवून असलेल्या संस्थापक पॅनेलचा हा पराभव वाईच्या सहकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण राजकीय व सामाजिक बदल म्हणून पाहिला जात आहे.