
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजच्या उमेदवार हसिरानी रथ यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसने (एमएआयटीसी) मंगळवारी केली आहे. एमएआयटीसीने भाजप उमेदवाराने निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रतिज्ञापत्रात विसंगती आणि चुकीची माहिती असल्याचा आरोप एमएआयटीसीने केला आहे.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एमएआयटीसीने पक्षाच्या सोशल मीडिया शाखेने एक्सवरील पोस्टमध्ये भाजप उमेदवार हसिरानी रथ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे फोटो शेअर केले आहेत. हसिरानी रथ यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे आणि त्या 1965 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या, असा दावा पक्षाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे.
रथ यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या शाळेला 1973 मध्येच दहावीची परीक्षा घेण्याची परवानगी मिळाली होती. मग 1973 पूर्वी परीक्षा घेण्याची परवानगी नसताना त्या परीक्षेला कशा बसल्या, असा प्रश्न पक्षाने उपस्थित केला. याशिवाय रथ यांचे जन्मवर्ष आणि त्या दहावी उत्तीर्ण झाल्याच्या वर्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात केले आहे. एका पोस्टमध्ये, पक्षाने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी केली आहे.

























































