
रस्त्याचे काम सुरू असताना स्कुटी घसरून मायलेकी पॅचवर्कच्या गरम मास्टिकमध्ये कोसळल्याची घटना वसईतील पाली रोडवर घडली. उकळत्या डांबरामुळे मायलेकी होरपळल्या असून पालिक्याच्या रस्ते कामातील ठेकेदाराचा निष्काळजीपणा यानिमित्ताने समोर आला आहे.
नायगाव पश्चिमेतील पाली रोडवरील दर्गा नाक्याजवळ ही घटना घडली. ठेकेदाराने रस्त्याच्या पॅचवर्कसाठी गरम मास्टिक टाकले होते. मात्र वाहनचालकांना धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी बॅरिकेड्स, सूचना फलक काहीच नव्हते. शनिवारी पहाटे ५ वाजता सोनाली मिरची आपल्या आई सुशिला यांना डायलिसिससाठी रुग्णालयात घेऊन जात होत्या. वसई किल्ला बंदर येथून त्या स्कुटीने नायगावच्या दिशेने जात असताना पॅचवर्क केलेल्या ठिकाणी त्यांची स्कुटी घसरली. स्कुटी मास्टिकवर गेल्यानंतर टायर चिकटल्याने आणि त्यानंतर टायर फुटल्याने स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि दोघीही रस्त्यावर कोसळल्या. या दुर्घटनेत सोनाली यांच्या हात-पायांना भाजल्याची, तर सुशिला मिरची यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघींनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




























































